सोयीच्या राजकारणाला पवारांचे टॉनिक..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:27 PM2019-01-27T23:27:29+5:302019-01-27T23:27:39+5:30
सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या मागील पिढीमध्येही वाद होते. तर आता या ...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या मागील पिढीमध्येही वाद होते. तर आता या दोघांमध्येही वाद होतात व पुन्हा मिटतात. त्यामुळे सातारकरांना आता याची सवय झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे दोघे राजे एकत्र येताना दिसत आहेत. म्हणूनच कार्यकर्ते आणि जनतेने फार अपेक्षा लावून काही फायदा होईल, असे दिसत नाही. सर्वांची अवस्था मुकी बिचारी कोणीही हाका, अशीच झाली आहे.
राजेंच्या दोन पिढ्यांमधील वाद सर्व सातारकरांना माहिती आहेत आणि त्यांना एकत्र आणणाऱ्या बुर्जुग व्यक्तींनाही हे फार ताणले जाणार नाही याची जाणीव आहे. पण यामध्ये भांडत बसतात बिच्चारे कार्यकर्ते. त्यांना वाटते खरेच राजेंमधून विस्तव जात नाही. त्यासाठी मग जीवावर उदार होऊन ते ‘राजे तुमच्यासाठी काय
पण’ असे गाडीवर आणि छातीवर मिरवत फिरत असतात. याला कुठेतरी आवर घातला पाहिजे.
आपल्या अंगावर आले की कोणी कोणाचा नसतो शेवटी कांगारू नाकापर्यंत पाणी येईपर्यंत पिलाला वाचवते आणि नाकातोंडात पाणी जायला लागले की पिलाला पायाखाली घेते. ही लहानपणी शिकलेली गोष्ट आपण विसरत चाललो आहोत काय? त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांना तोंडावर पडण्याची वेळ येते. दोन्ही राजे वेगळे झाल्याचे आणि पुन्हा एकत्र आल्याचे सातारकर उत्सुकतेने पाहतात आणि पुन्हा त्याच मानसिकतेत एकमेकांच्या भलावाणी करतात. केवळ
उत्सुकता याशिवाय यात काहीच राहत नाही.
सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आणि खासदार उदयनराजेंना राष्ट्रावादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी जिल्हाभर दौरे करून स्वत:ची ताकद उभी केली आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्वास स्वत:मध्ये निर्माण केला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी दोन्ही राजेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. (तसे दोघांनाही फार काळ लांब राहायचे नव्हतेच) पण त्यासाठी कोणी तरी वैद्य पाहिजे होता. ती जबाबदारी खासदार शरद पवार यांनी पार
पाडली.
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांनी अनेकांना आपल्या गाडीतून प्रवास घडविला आहे. त्यांनी एखाद्याला आपल्या गाडीत घेतले की सर्वांनी काही गोष्टी समजून घ्यायच्या, असा प्रघात झालेला आहे. कोणालाही पवारांच्या गाडीत सहज प्रवेश मिळत नाही, तर ते नियोजनपूर्वक ठरविले जाते. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पवारांसोबतचा गाडीतील प्रवास बरेच काही सांगून जातो. त्याचा
प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावत असतो.
राज्यातील काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्या. मात्र, साताºयाच्या आणि माढ्याच्या जागेबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. कोल्हापूरमधील राष्ट्रवादीची जागाही अडचणीची होती. मात्र त्याबाबत शरद पवार यांनी या जागेवर विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, असे जाहीर केले आहे. तसे सातारा आणि माढाबाबत झालेले नाही. त्यामुळे या जागांवर नक्की कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. या जागांवर काहीजण राष्ट्रवादीकडून दावा करू लागल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण झाला
आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोणालाच अजूनही अंत लागू दिला नाही. ते फारसे कोणाला अंगाला लागूनही घेत नाहीत. त्यामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र्र मोदी देखील त्यांच्यापासून सावध राहा! असाच सल्ला राज्यात आल्यानंतर देतात आणि केंद्रात सोबत राहून अनेक चर्चा घडवून आणतात.
राजकारणात सब कुछ माफ असते, असे म्हटले जाते. अनेकदा खासदार उदयनराजेही राजकारण म्हणजे काय याची व्याख्या सांगतात. जे दिसते तसे कधीच करायचे नाही आणि जे करायचे ते कधीच दाखवायचे नाही. यालाच राजकारण म्हणतात. त्यामुळे शरद पवार काय दाखवितात आणि करतात याचा अर्थ समजून घेतला तरी बºयाच गोष्टी साध्य होतील.
परिस्थितीच्या राजकारणाला प्रारंभ...
राजे आणि जनता यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. कार्यकर्त्यांना न दुखवता एकमेकांच्या कार्यकर्त्यांसाठी दोन्ही राजे भांडतात असे दिसते; पण आता कार्यकर्त्यांचा काहीच विषय नाही. आता आमदारकी आणि खासदारकी असा सामना होणार आहे. त्यामुळे राजेंचा विषय आल्यावर कार्यकर्ते काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे असणार आहे. दोन्ही राजेंना आपापला मार्ग मोकळा करावयाचा आहे. खासदारकीचा मार्ग सुकर झाला तर उदयनराजे आमदारकीसाठी शिवेंद्र्रराजेंना मदत करतील, अशी आशा आहे. पण करतीलच हा विश्वास नाही. तर शरद पवारांसाठी खासदारकीला उदयनराजेंना मदत करावी लागेल, अशी शिवेंद्रराजेंची अगतिकता आहे. त्यामुळे दोघांनीही सध्याच्या परिस्थितीत आपापल्या राजकारणासाठी जुळवून घेण्याचे नियोजन केल्याचे दिसते. यालाच परिस्थितीचे राजकारण म्हणतात.