वाई : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेंन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीने पाच लाख पंधरा हजार ९१५ ब्रास गौण खनिज उत्खनन केले. स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये रक्कम भरण्याचे आदेश तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिले आहेत.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारा रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत साताऱ्यात खंबाटकी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या कंपनीस ठेकेदार म्हणून नेमण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या गौण खनिजप्रकरणी स्वामित्वधन व दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास तहसीलदार रणजीत भोसले व सातारा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी बजावली होती. या नोटिसा विरोधात संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन नोटीस रद्द करण्याची मागणी केली होती. हे सरकारी काम असून या ज्या गटातून हे उत्खनन केले जात आहे त्याच गटात हे वापरले जाणार आहे. त्यामुळे शासनाचे गौणखनिज स्वामित्वधन व दंडाची रक्कम आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे न्यायालयाने या नोटिसा रद्द कराव्यात व स्वामित्वधन दंडाची रक्कम माफ करावी अशी मागणी ठेकेदाराने न्यायालयाकडे केली होती.
सुनावणीदरम्यान हे आदेश नसून नोटीस आहेत. यासाठी तहसीलदार वाई यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंपनीने आपले म्हणणे त्यांच्याकडे सादर करावे. तसेच तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे एकूण घेऊन योग्य ते आदेश पारित करावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने तहसीलदार रणजित भोसले यांना निर्देश दिले होते. याप्रमाणे मे २०२१ मध्ये तहसीलदार वाई यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधित कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे गौणखनिज उत्खनाचे स्वामित्व धन व दंडा पोटी संबंधित कंपनी ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांनी ठेकेदार कंपनी दिले आहेत.