कोरेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये. लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात टोलनाक्यांवर टोल भरावा लागत आहे. आता दि. १ एप्रिलपासून टोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी, पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाचे काम अद्यापही सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही.
काही जणांनी टोलच्या दरात पाच टक्के कपात करण्याविषयी मागणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टोलनाक्यांवर एमएच ११ व एमएच ५० अशी नोंदणी असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. आता टोलनाक्यांवर ठेकेदार बदलला आहे. रिलायन्स इन्फ्राकडे महामार्ग निर्मितीचे काम आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी अद्याप पुणे-सातारादरम्यानच्या महामार्गाचे काम सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. तरी देखील दरवर्षी टोलच्या दरात वाढ केली जात आहे, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली.
याबाबत आम्ही राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर, हा विषय केंद्र शासनाशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र शासन कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम का करत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने टोलच्या विषयामध्ये सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या विषयामध्ये तातडीने लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आ. शिंदे यांनी केली आहे.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये, लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे.