मायणीतील पेरू बागांनाही अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:30 AM2019-11-16T11:30:37+5:302019-11-16T11:32:15+5:30
मायणी परिसरातील पेरू जगप्रसिद्ध आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी उत्पन्नात घट झाली असून, अजूनही शासनामार्फत पंचनामे झाले नसल्याने पेरू उत्पादकांची मोठी अडचण होऊन बसली आहे.
मायणी : मायणी परिसरातील पेरू जगप्रसिद्ध आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी उत्पन्नात घट झाली असून, अजूनही शासनामार्फत पंचनामे झाले नसल्याने पेरू उत्पादकांची मोठी अडचण होऊन बसली आहे.
जगप्रसिद्ध व विविध आजारावर गुणकारी असलेल्या मायणीच्या पेरुंच्या बागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये पेरुचा बहर धरला जातो. मात्र, याच दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. पेरुच्या झाडांना लागणाऱ्या फुले, कळ्या गळून पडल्यामुळे यावर्षी पेरुच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे अवेळी पेरू पूर्ण पिवळे पडत आहेत. यामध्ये अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे.
आजपर्यंत संबंधितांकडून व प्रशासनाकडून पेरुच्या बागांचे पंचनामे झाले नसल्याचे बागायतदार सांगत आहेत. त्यामुळे शासनाकडून व संबंधितांकडून पेरू व इतर फळबागांचेही पंचनामे करावेत, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे.
- अवकाळी पावसामुळे फुले व कळ्या मोठ्या प्रमाणात गळाल्या आहेत. तसेच पेरुमध्ये अळ्यांचाही (किडीचा) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पन्न घटले आहे.
-विजय देशमुख,
पेरू उत्पादक, मायणी
- मायणी व मायणी परिसरामध्ये सुमारे दोनशे एकरपर्यंत पेरुचे क्षेत्र आहे. यातील काही बागांचे पंचनामेही झाले आहेत. मात्र बहुतांशी पंचनामे राहिले आहेत. त्यामुळे संबंधितांकडून व प्रशासनाकडून सर्वबागांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.