साताऱ्यातील शनिवार पेठेतील एका किराणा दुकानाबाहेर नागरिकांची रांग लागली होती. दोन तरुणही या रांगेत किराणा घेण्यासाठी उभे होते. फिजिकल डिस्टन्समध्ये जो-तो साहित्य घेऊन पुढे मार्गस्थ होत होता. या वेळी तरुणांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीवरून चर्चा रंगली. एक तरूण म्हणाला ‘आरं पेट्रोल शंभरला लिटर पण येईना, आता गाडीवर नाय चालतच आपली कामं करायची.’ ‘हो तर काय.. आता मी पण म्हणतोय गाडी बंदच करावी. महागाई काय जगू देईना’ दुसरा तरुण उच्चारला. इतक्यात दुकानातून एक व्यक्ती हातात तेलाची पिशवी घेऊन बाहेर पडला. त्यातील एका तरुणाने त्यांना आवाज देत ‘अहो काका कशी झाली पिशवी’ असा प्रश्न केला. त्यावर ‘अरे १७० रुपये दिले बघ.. काय करणार’ असं म्हणत ते काका पुढे निघून गेले. इतक्यात एक तरुण ‘पेट्रोल.. डिझेल आगे बढो तेल तुम्हारे साथ हैं’ असं मोठ्यानं ओरडला. त्याचं हे बोलनं ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अनेकांनी त्याच्या या वाक्याला समर्थन देत आपल्या ‘भावना’ही व्यक्त केल्या.
- सचिन काकडे