लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला सव्वा वर्ष होऊन गेले असून, आतापर्यंत दोन लाखांपर्यंत रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक ४१ हजारांवर रुग्णांची नोंद सातारा तालुक्यात झाली आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर सव्वा महिन्यांपूर्वी फलटण तालुका बाधितांमध्ये कऱ्हाडला मागे टाकून दुसऱ्या स्थानी आला होता. पण, सद्यस्थितीत कऱ्हाड तालुक्यात रुग्ण वाढल्याने फलटण तालुका तिसऱ्या स्थानी गेला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तर एप्रिल महिन्यापासून हजारांत रुग्ण सापडू लागले. त्यामुळे एका दिवसात अडीच हजारांवरही बाधित संख्या गेली. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णसंख्या दोन लाखांजवळ पोहोचली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १ लाख ९७ हजार ५२३ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यामधील ४१,११२ कोरोना रुग्ण हे सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत. तर यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो. मे महिन्यात फलटण तालुक्यात रुग्ण वेगाने वाढले होते. त्यावेळी कऱ्हाड तालुका बाधितांमध्ये तिसऱ्या स्थानी गेला तर फलटण तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यातच गेल्या काही दिवसात कऱ्हाड तालुक्यात बाधितांचा वेग वाढला आहे. त्यामुळे फलटण तालुका मागे पडला तर कऱ्हाड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या कऱ्हाड तालुक्यात २८,८८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर फलटणमध्ये २८,६६५ रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ४,४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.
.......................................
चौकट :
जूनमध्ये कऱ्हाडला सर्वाधिक रुग्णवाढ...
जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ ही कऱ्हाड तालुक्यात नोंदविण्यात आली. तब्बल ५,२९२ बाधित सापडले तर सातारा तालुक्यात ५,०५० आणि फलटण तालुक्यात २,०५८ रुग्णांची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. रुग्णांची संख्या वाढल्यामुळेच कऱ्हाड तालुका बाधितांमध्ये पुन्हा दुसऱ्या स्थानी आला आहे.
चौकट :
तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - ४१११२ १२५९
कऱ्हाड - २८८८५ ८४६
फलटण - २८६६५ २८७
कोरेगाव - १७११८ ३८९
वाई - १२८४० ३४०
खटाव - १९८७१ ४९८
खंडाळा - ११९७४ १५२
जावळी - ८७०० १९७
माण - १३३०७ २६४
पाटण - ८६९९ २०५
महाबळेश्वर - ४३०६ ४५
इतर - १३८० ...
.....................................................