फलटण : शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी येतात. आज फलटणमध्ये सकाळी कावडी येताच भाविकांतर्फे या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले. कावडीच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लावलं जातं. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. या यात्रेनिमित्त फलटण येथून शिखर शिंगणापूरकडे जाणार्या या सर्व मानाच्या कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने शंभू महादेवाच्या पायथ्याशी मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी फलटणमधील भाविकांनी या कावडींचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्या आणि हरहर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.सासवड (जि. पुणे) येथील भुतोजीबुवा तेली या कावडीचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे व कावडीचे स्वागत व पूजन झाले.गुणवरे (ता. फलटण) येथील आढाव कुटुंबाच्या कावडीला वाटाड्याचा मान असून सर्वात पुढे असलेल्या या कावडीमागून उर्वरित कावडी मानानुक्रमे जातात तर तेल्या भुत्याच्या कावडीचा मान शेवटी असतो.मुंगी घाटातून या सर्व कावडी उद्या रविवार सायंकाळपर्यंत शिखर शिंगणापूर डोंगर पठारावर पोहोचतील आणि तेथून मानानुक्रमे शंभू महादेवाला जलाभिषेक करुन परततील दरम्यान मानकरी तसेच राज्यातील कावडीधारकांचा श्री. छ. राजमाता कल्पनाराजे भोसले, श्री.छ. खा. उदयनराजे भोसले, ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर बडवे समाज आणि ग्रामस्थांच्यावतीने या सर्व कावडींचे व भाविकांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात येणार आहेत. प्रचंड उन्हाचा तडाखा आणि मुंगी घाटाची उभी चढन या कावडी व त्यांचे मानकरी आणि भक्त सहजपणे चढून जाताना पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक मोठया संख्येने घाटाच्या पायथ्याशी आणि पठारावर उपस्थित असतात. शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. विशिष्ठ प्रकारची वाद्ये आणि हर हर महादेवाचा जयघोषच मुंगी घाटातून कावडी वर नेण्याची प्रेरणा व शक्ती असल्याने त्याच्या निनादात आणि शंभू महादेवाच्या जयघोषात कावडी वर नेण्यात येतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी व मानाची कावड असते ती तेल्या भुत्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. मोठ्या कष्टाने कावड वर नेली जाते आणि रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्यानं शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो. फलटणमध्ये कावडींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Satara- फलटणला मानाच्या कावडींचे स्वागत, श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:34 AM