कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:33+5:302021-07-27T04:40:33+5:30
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील ...
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे.
रस्त्यावर कचरा
कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू रस्त्यावर पसरत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पिकांचे नुकसान
रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्ता खचल्याने धोका
शामगाव : अंतवडी (ता. कऱ्हाड) येथील अंतवडी ते मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत विहीर आहे, त्याठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाने रस्ता खचल्यामुळे त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे.