दहिवडी : ‘सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी बाजूची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करुन निसर्गाचा समतोल साधावा,’ अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. केंद्रीय रस्ते विकास मंडळातर्फे या रस्त्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हसवड हद्दीत या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण आहे. तर काही ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे. बऱ्याच ठिकाणी छोट्या पुलाची बांधणी अपूर्ण आहे. माण तालुका हद्द ते पंढरपूर या दरम्यानचे काम पूर्ण आहे. तर सातारा ते कोरेगाव दरम्यानचे काम प्रगतीपथावर असून एकूणच या रस्त्यांच्या बांधणीसाठी ठेकेदाराला दिलेला कालावधी संपलेला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या सर्व झाडांची अक्षरशा कत्तल करण्यात आली. शेकडो वृक्ष विकासाच्या नावाखाली तोडण्यात आले आहेत.
रस्त्याकडेचे वृक्ष तोडताना शासनाने रस्ते विकास मंडळाला वृक्षारोपणाची नवीन नियमावली घालून दिलेली आहे.
सातारा रस्त्यालगत असणाऱ्या व तोडल्या गेलेल्या झाडाझुडपाच्या तीनपट झाडे नव्याने लावण्याची अट आहे. दळणवळण सोयीसाठी महामार्ग महत्त्वपूर्ण ठरला आहे. पूर्वीच्या झाडांची समानता राखण्यासाठी या रस्त्यावर नव्याने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
सातारा पंढरपूर या १५० किलाेमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा नव्याने वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होणार आहे. तसेच या रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी तातडीने वृक्षारोपण करावे, अशी मागणीही प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.