प्लास्टिक कचऱ्यातून इंधन निर्मिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:18 AM2019-11-23T00:18:11+5:302019-11-23T00:18:15+5:30
सचिन काकडे । सातारा : प्लास्टिक कचºयाची कोंडी फोडण्यासाठी सातारा पालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, सोनगाव टेपोत बेलिंग ...
सचिन काकडे ।
सातारा : प्लास्टिक कचºयाची कोंडी फोडण्यासाठी सातारा पालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, सोनगाव टेपोत बेलिंग मशीन बसविण्यात आली आहे. या मशिनीद्वारे संकलित होणारा प्लास्टिक कचरा शासनाने नियुक्त केलेल्या विक्रेत्यांना दिला जाणार असून, तो सिमेंट फॅक्टरी व इंधन निर्मितीसाठी उपयोगात आणला जाणार आहे.
घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. या कचºयाची विल्हेवाट लावणं ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. हा कचरा जाळल्यास त्यातून होणाºया उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. ही बाब पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. हा धोका ओळखून सातारा पालिकेकडून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
सोनगाव कचरा डेपोत तब्बल ६० गुंठे क्षेत्रात प्रकल्पाचे प्रोसेसिंग शेड उभारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वे ब्रीज, सर्व्हिसिंग सेंटर, स्टोअर रूम व स्टाफ रूमचे बांधकामही पूर्ण झाले आहे. सुमारे ४० टनी वजनकाटा या ठिकाणी बसविण्यात आला आहे. या डेपोत दररोज ६० ते ७० टन ओला व सुका कचरा संकलित होतो. यामध्ये सुमारे ४०० ते ५०० किलो प्लास्टिकचा समावेश आहे. या कचºयापासून कायमस्वरुपी सुटका मिळावी, यासाठी सातारा पालिकेने डेपोत बेलिंग मशीन बसविली आहे.
डेपोत संकलित होणाºया कचºयातून सर्वप्रथम प्लास्टिक कचरा वेगळा केला जातो. यानंतर हा कचरा बेलिंग मशीनमध्ये टाकला जातो. कचºयावर दाब देऊन त्याचे २५ ते ५० किलो वजनाचे गठ्ठे तयार केले जातात. हा कचरा शासनाने नियुक्त केलेल्या विक्रेत्यांना दिला जाणार असून, त्याचा उपयोग पुढे इंधन, डांबर निर्मितीसाठी केला जाणार आहे. भविष्यात प्लास्टिकचा पुनर्वापर करून लघु प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मनोदय आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. हा प्रकल्प स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अनेक वर्षांपासूनची धुराची समस्याही संपुष्टात
सोनगाव डेपोत प्लास्टिक कचरा पेटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
उन्हाळ्यात धुराचे लोट पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत पसरतात.
सोनगाव, शेंद्र्रे, जकातवाडी, डबेवाडी, शहापूर यासह दहा ते पंधरा गावांना याचा त्रास सहन करावा लागतो.
प्लास्टिक कचºयाचा प्रश्न मार्गी
लागल्याने आता ग्रामस्थांची धुरापासून सुटका होणार आहे.
ओल्या कचºयातून निघणाºया सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाही डेपोत करण्यात आली आहे.