प्रगती जाधव-पाटील ।सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या वैभव धामणकरने खंडाळा पोलिसांनी अटक न करता दीर्घकाळ ताब्यात ठेवून शासकीय वाहनातून अपहरण करत वाई पोलीस ठाण्यात अटक प्रक्रिया राबविल्याचा अर्ज वाई न्यायालयात दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विषयाचा गुंता वाढला आहे.
फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात खंडाळा पोलिसांना हवा असलेल्या वैभव धामणकरला अखेर पोलिसांनी खंडाळ्याचा घाट दाखवलाच. ‘साहेब, मला अटक करा’ म्हणणाऱ्या धामणकरला वाई पोलिसांनी त्यांच्याकडील एका गुन्ह्यात अटक केली. सोमवारी तब्बल सहा तास पोलीस ठाण्यात थांबवून ठेवल्यानंतर त्याला अटक न करता चक्क शासकीय वाहनाने वाईत नेऊन वाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.न्यायालयाने मंगळवारी अंतरिम जामिनावर धामणकरला सोडून दिले. ‘फरारी संशयित म्हणतो साहेब मला अटक करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये खंडाळा पोलीस ठाण्यातील अजब प्रकाराचे वृत्त प्रसिद्ध झाले. या प्रकरणाची प्रसारमाध्यमातून वाच्यता होण्यापूर्वी खंडाळा पोलिसांनी संशयित वैभव धामणकरला अटक न करण्यासाठी वाई पोलिसांच्या ताब्यात देऊन द्र्रविडी प्राणायाम घातला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यात धामणकरला अटक करण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पोलिसांत ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. ‘साहेब मला अटक करा,’ अशी विनंती तो पोलिसांना करत होता. मात्र, पोलिसांना धामणकर नकोसा वाटत होता. त्याला अटक करून उगीच नको ते व्याप वाढले जाईल, या भीतीने पोलिसांनी फोनाफोनी करून सावध पवित्रा घेतला होता. रात्री साडेअकरा वाजता त्याला पोलीसगाडीत कोंबून वाईच्या दिशेने पोलीसगाडी दामटवण्यात आली. वाईत पोलिसांत वैभव धामणकर विरोधात यापूर्वीचा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराने आपले पैसे मिळाल्याने धामणकरबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना यापूर्वीच लेखी कळविले आहे. तरीही खंडाळ्यातील कारवाई टाळण्यासाठी धामणकरला वाईत अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला वाई न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ही मागणी करताना पोलिसांनी रिमांड रिर्पोटमध्ये या गुन्ह्यातील फिर्यादीची धामणकरबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे.
फिर्यादीची रक्कम तिला परत मिळाल्याने फिर्यादीने तक्रार मागे घेतली आहे, तर मग वाई पोलिसांना धामणकरला अटक करण्याची गरज का भासली? असा प्रश्न निर्माण होतो. वैभव धामणकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अंतरिम जामिनावर वैभव धामणकर याला न्यायालयाने खुले केले आहे. दरम्यान, धामणकर प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून खंडाळा पोलीस काळजी घेत असताना नव्याने चुका करत सुटले आहेत. वैभव धामणकर याने मंगळवारी वाईच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खंडाळा पोलिसांच्या कार्यवाहीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.अधिकारी अनभिज्ञ...याविषयी फलटणचा अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस उपअधीक्षक सुहास गरूड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी रजेवर असल्यामुळे या प्रकरणाची मला पूर्ण माहिती नाही. संबंधित कर्मचाºयाकडून माहिती घेऊन मगच याविषयी मला बोलता येईल.’ त्यानंतर गरूड यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकीकडे पोलीस ठाण्यातील कर्मचारी, ‘आम्ही साहेबांशी बोलूनच प्रत्येक पाऊल उचलतोय,’ अशी माहिती देत आहेत, तर दुसरीकडे अधिकारी याविषयी ेअधिकारी अनभिज्ञ असल्याचे सांगत आहेत. या परस्पर विरोधी विधानांमुळे या प्रकरणात निश्चितच पाणी कुठंतरी खोलवर मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.