‘लोकमत’ची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यास सुनावली पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:31 AM2020-10-09T02:31:15+5:302020-10-09T02:31:25+5:30
पैसे उकळले; शिफ्टिंग खर्चाची खोटी बिले दाखविली
सातारा : लोकमत कर्मचाºयाने बदली झालेल्या ठिकाणी सामान घेऊन जाण्यासाठी शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल सादर करून ‘लोकमत’कडून जास्तीची रक्कम उकळल्याचे उघडकीस आले. या प्रकारानंतर ‘लोकमत’च्या प्रशासन विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर सातारा शहर पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाºयाला अटक केली. त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भगीरथ शंकर वाणी (वय ५५, सध्या रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. शिवकॉलनी, आनंद एसटीडी लाईनजवळ, जळगाव) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘लोकमत’च्या कार्यालयामध्ये भगीरथ वाणी हा कार्यरत होता. त्याची सावंतवाडीहून सातारा लोकमत कार्यालयात बदली झाली होती. या बदलीनंतरचा शिफ्टिंगचा खर्च वास्तवापेक्षा जास्तीचा दाखवून कंपनीकडून जास्तीचे पैसे उकळले. परंतु, या बिलाबाबत शंका आल्याने कोल्हापूर येथील ‘लोकमत’चे व्यवस्थापक मनुष्यबळ व प्रशासनाचे संतोष साखरे यांनी चौकशी केली असता वाणी याने संबंधित टॅव्हल्स कंपनीकडून कोरे बिल घेतले. त्यावर वास्तव रकमेपेक्षा जास्तीची रक्कम लिहून जास्तीचे पैसे उकळले व लोकमतची फसवणूक केल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर वरिष्ठ सरव्यस्थापक मकरंद देशमुख यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात भगीरथ वाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार साताऱ्यात घडल्यामुळे हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन वाणी याला अटक केली. बुधवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.