चाफळ : चाफळ (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यकांत पाटील यांचे निधन झाल्याने सरपंचपद रिक्त झाले आहे. या पदासाठी जनतेतून पुन्हा निवडणूक होणार की जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड करणार, याकडे संपूर्ण चाफळ विभागाचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच आपलाच होणार असल्याचे जाहीर केल्याने ऐन पावसात चाफळचे राजकीय वातावरण तापले आहे.
निवडणुकीदरम्यान नेहमीच या ग्रामपंचायतीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रत्येकवेळी अटीतटीची निवडणूक होत असते. मागील अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सरपंचपद हे निवडून आलेल्या सदस्यांमधून न निवडता ते थेट जनतेतून निवडण्याचा आदेश शासनाने काढला होता. त्यावेळी या ठिकाणी तशा पद्धतीने निवडणूक लढवण्यात आली होती. यावेळी शिवसेनेतून सूर्यकांत पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून लक्ष्मण बाबर यांचा सामना रंगतदार होऊन यात सूर्यकांत पाटील हे अवघ्या दोन मतांनी निवडून आले होते. नुकतेच सूर्यकांत पाटील यांचे निधन झाल्याने येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. त्यांच्या या रिक्त झालेल्या सरपंचपदी पुन्हा जनतेतून निवडणूक होणार की निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडणार, याकडे संपूर्ण चाफळ विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी नवीन आदेश पारित करत लोकनियुक्त असणाऱ्या सरपंचपदाची निवडणूक रद्द करून ती निवडून आलेल्या सदस्यांमधून पूर्वीसारखीच करण्याचा अध्यादेश काढला आहे. सदस्यांमधून सरपंच निवड केल्यास येथे शिवसेना अडचणीत सापडणार आहे. सध्या सत्ताधारी शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य असल्याने नवीन आदेशाप्रमाणे सरपंचपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याने शिवसैनिकांची याठिकाणी गोची झाली आहे. शिवसेनेला आपला सरपंच बनवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडावे लागणार आहेत. काही शिवसैनिकांनी येथील सरपंचपद हे लोकनियुक्त असल्याने येथे पुन्हा निवडणूक लढवावी, यासाठी देखील शासन दरबारी हेलपाटे मारणे सुरू केले आहे.
चौकट...
...तर यांची लागणार लॉटरी
सदस्यांमधून जर सरपंच निवडला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने आशिष पवार यांची सरपंचपदी लाॅटरी लागणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडल्यास सध्याचे उपसरपंच सुरेश काटे यांची सरपंचपदी लाॅटरी लागू शकते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच पदावर दावा करत सरपंच आपलाच होणार असल्याचे जाहीर केल्याने ऐन पावसात चाफळचे राजकीय वातावरण तापले आहे.
चौकट :
निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात..
चाफळ येथे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी जनतेतून पुन्हा निवडणूक होणार की जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड करणार याबाबत पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांना विचारले असता जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेणार घेतील. सध्या तरी आमच्या कार्यालयाला कोणताही आदेश दिलेला नसल्याचे सांगण्यात आले.