फलटण : ‘जनतेने मनात आणले तर ती भल्याभल्यांना पराभूत करू शकते. अन्याय झुगारा आणि महाविकासाला साथ द्या,’ असे आवाहन करतानाच ‘आम्ही राजकारण्यांना वाड्यावरून बांधावर आणण्याचा चंग बांधला आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फलटण येथे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीत झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘सामान्य माणसेच क्रांती करू शकतात. आता फलटण तालुक्यात क्रांतीची वेळ आली आहे,’ असे सांगून खा. शेट्टी म्हणाले, ‘सामान्य माणूस पिसाळला, तर तुमची शंभरी भरलीच समजा. घराघरात भांडणे लावून राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेसना जनतेने संपवावे. या मंडळींना सत्तेचा माज आला आहे. आपल्या डोक्यावर कायम लाल दिवा राहणारच, असा त्यांचा समज आहे. त्यांचा माज उतरविण्याचा शब्द मी देतो.’ ‘आमचा उमेदवार ‘शोपीस’ नसेल,’ अशा शब्दांत आमदार दीपक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावतानाच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना लुटणारे साखर कारखानदार व बँका बुडवणाऱ्यांची चौकशी लावू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. ते म्हणाले, ‘फलटणमध्ये काही झाले तरी रासपचाच उमेदवार असणार आहेत. इथून पुढे कोणीही गुंडगिरी, अन्याय केला तर येरवडा जेलमध्ये जाल.’ यावेळी नगरसेवक अनुप शहा, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वराज संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुकर माळवे, डॉ. उत्तमराव शेंडे, प्रकाश बोंगळे, दत्तूभाऊ धुमाळ, आमीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हा युवक काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)
राजकारण्यांना आणू वाड्यावरून बांधावर !
By admin | Published: September 02, 2014 11:47 PM