मलकापूर : एका बाजूला कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ व दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम अशा दोन्ही कामाला केवळ चारच आरोग्य कर्मचारी व लसीकरण केंद्र नसल्यामुळे लसीकरणासाठी मलकापुरातील नागरिकांची फरपट होत आहे. शहरातील पस्तीस हजारांवर लोकसंख्येच्या सेवेला २ कंत्राटी तर २ कायमस्वरूपी अशा केवळ चार आरोग्यसेवकांवर भिस्त आहे. शहरातील अपुरी आरोग्यसेवा विचारात घेऊन प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
मलकापुरात गत आठ दिवसांत ५८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी तीन दिवसांत ३८ बाधित सापडले, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असताना, पूर्वीपासूनच शासनाच्या आरोग्य विभागाने दोन आरोग्यसेवक व दोन आरोग्यसेविकांची नियुक्ती केलेली आहे. त्यातही दोन कंत्राटी व दोन कायम कर्मचारी आहेत. या चार कर्मचाऱ्यांवरच ३५ हजारांवर लोकसंख्येच्या सेवेची जबाबदारी आहे. पाच हजार लोकसंख्येला दोन आरोग्यसेविका व एक आरोग्यसेवक अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, असा शासनाचा नियम आहे. मलकापुरात ३५ हजार लोकसंख्येला किमान २१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणे गरजेचे असताना, केवळ काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे चारच कर्मचारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन अहोरात्र काम करतात. एका बाजूला कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्ण शोधून त्यांची हायरिस्क व लो रिस्क शोधणे. त्यांच्या तपासण्या करणे, अशी विविध कामे करताना, या चारच कर्मचाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. याशिवाय इतर आरोग्यसेवा देणे गरजेचे असते. दुसऱ्या बाजूला शहरात शासकीय लसीकरण मोहिमेतील लसीकरणासाठी कर्मचारी व ठिकाणाच नसल्यामुळे मलकापुरातील नागरिकांची फरपट होत असल्याचे चित्र आहे.
येथील पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्राची मागणी केली आहे. तोपर्यंत शहरातील नागरिकांना काले प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कऱ्हाड शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मोफत व या व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात पैसे भरून लस घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ३५ हजार लोकसंख्येच्या शहरातील ही अपुरी आरोग्यसेवा विचारात घेऊन नुकतेच मंजूर झालेले मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
- चौकट
एकही आशासेविका नाही
इतर शहरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीला जिल्हा प्रशासनाकडून आशासेविकांची नेमणूक केलेली आसते. मात्र, मलकापूर शहरात ३५ हजार लोकसंख्येच्या सेवेला चारच आरोग्यसेवक असताना, एकही आशासेविकेची नेमणूक केलेली नाही. अशा अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे शहरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविताना कसरतच करावी लागत आहे.