लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. तसेच वीज कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफार्मरबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही कबुले यांनी सुचित केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीची मासिक सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, सदस्य दीपक पवार, शिवाजीराव सर्वगोड, अर्चना देशमुख, सुवर्णा देसाई आदी उपस्थित होते.
या सभेत सदस्यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे तसेच फळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष उदय कबुले यांनी अवकाळीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच रबी हंगामाच्या दृष्टीने जानेवारी आणि फेब्रुवारी महिने महत्त्वाचे असतात. या काळात पिके पक्व होण्याच्या स्थितीत असल्याने पाणी देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीजपुरवठा कसा सुरळीत होईल, ते पहावे. तसेच नादुुरुस्त ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, अशी सूचना केली.
चौकट :
विशेष सभेचे आयोजन...
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाहीत. यासाठी स्थायी समितीची विशेष सभा २२ किंवा २३ जानेवारीला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या सभेत विविध निर्णय घेण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.
.......................................................