प.पू. श्री सेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानेच पुसेवाडीचा पुसेगावापर्यंत प्रवास शक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:45+5:302021-01-13T05:39:45+5:30

श्री सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथोत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने सलग दहा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजरात ...

P.P. Pusewadi's journey to Pusegaon is possible only with the grace of Shri Sevagiri Maharaj! | प.पू. श्री सेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानेच पुसेवाडीचा पुसेगावापर्यंत प्रवास शक्य !

प.पू. श्री सेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानेच पुसेवाडीचा पुसेगावापर्यंत प्रवास शक्य !

Next

श्री सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथोत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने सलग दहा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजरात राज्यातील लाखो भाविक या काळात पुसेगावात हजेरी लावतात. शेतकऱ्यांची यात्रा म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न असतो. शेतकरी बांधव व त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेले कृषी उत्पादक, तंत्रज्ञ, उद्योजक, पशू-पक्षी विषयक माहिती मार्गदर्शन या मधील दुवा बनण्याचे काम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट करत आले आहे. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव सध्या देवस्थान ट्रस्टचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनामुळे श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा होत नाही. श्री सेवागिरींच्या संजीवन समाधिच्या चरणी लीन होण्याची सर्वच भाविक भक्तांना लागलेली आस यावर्षी मात्र पूर्ण होणार नाही. तसेच दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत फिरते हॉटेल, उपाहारगृह, खेळणी, भांड्यांचे दुकानदार, महिलांसाठी उपयुक्त सौंदर्यप्रसाधनांची दुकाने, थंडीत उबदार साहित्य पुरवणारे दुकानदार, शेतकऱ्यांसाठी लागणारे सर्व साहित्याची दुकाने असे कोट्यवधींची उलाढाल यावर्षी कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच यंदा महाराजांची रथ मिरवणूक निघणार नसल्याने लाखो भाविकांकडून महाराजांच्या रथावर मनोभावी अर्पण होणारी लाखो रुपयांची देणगी यावर्षी भाविकांना बँकेतच जमा करावी लागणार आहे.

आजच्या पुसेगावात व पंचक्रोशीत आमूलाग्र बदल करण्यामध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या आगमनाला निश्चितच अतिमहत्त्वाचे स्थान आहे. रिद्धी-सिद्धी प्राप्त अशा परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांनी एक तपोयोगी या नात्याने त्याकाळात अनेक लोकोपयोगी कामे केली. रंजल्या-गांजल्यांचे दु:ख दूर करण्यास हातभार लावला, हेच पुसेवाडी काही काळातच सुवर्णनगरी पुसेगाव म्हणून ओळखले जाईल हा त्यांचा शब्द खरा ठरला आहे. आपल्या सुमारे ४३ वर्षांच्या वास्तव्यात महाराजांनी या भागातील गोर-गरिबांच्या कल्याणासाठी श्रद्धा, सेवा, नम्रता हीच खरी उपासना हा संदेश अखेरपर्यंत देत आपले अद‌्भुत कार्य संपल्यावर मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी, वार शनिवार शिवरात्रीच्या १० जानेवारी १९४८ रोजी जिवंत समाधी घेतली.

या देवस्थानचे दुसरे मठाधिपती प.पू. हनुमानगिरी महाराज यांच्या काळात १९७२ साली श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या देवस्थानचे मठाधिपती व विश्वस्तांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कामांचा डोंगर उभा केला आहे. पूर्वी महाराजांचे मंदिरात लाकडी मंडप होता. त्याठिकाणी ट्रस्टने अतिशय आकर्षक असा आरसीसी दर्शन मंडप बांधलेला आहे. त्यात काचेचे सुशोभीकरण करण्यात आले असून, संपूर्ण समाधी परिसरात ग्रॅनाइट बसविण्यात आले आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून ट्रस्टने पाच मजली भक्त निवासाची सर्व सोयींनीयुक्त भव्य इमारत उभी केली आहे.

श्री सेवागिरी देवस्थानच्या वतीने श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्यु.कॉलेज सध्या सुरू आहे तसेच श्री सेवागिरी विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन व इतर शैक्षणिक संस्थांना ट्रस्ट नेहमीच मदत करत आहे. १९६७ साली शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव येथे व्हावे या हेतूने गावातील शेतकऱ्यांकडून ११० एकर जमीन खरेदी करून त्यातील १०५ एकर जमीन त्या शासकीय विद्यानिकेतनला बक्षीसपत्राने दिली आहे. तसेच रोख तीन लाख ५० हजार रुपये देणगी दिली आहे. श्री सेवागिरी महाराजांचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला असून, दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या वार्षिक यात्रेला जागा कमी पडत असल्याने शासनाने त्यापैकी १३ हेक्टर ३ आर क्षेत्र पुन्हा देवस्थानला दिले आहे. मंदिरालगत असलेली जुनी धर्मशाळा पाडून त्या ठिकाणी नवीन भव्य वास्तू उभारण्यात येत आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी त्या ठिकाणी विशेष सोय करण्यात येणार आहे.

२००२-२००३ साली निसर्गाच्या अवकृपेने या भागात पर्जन्यमान कमी झाले. पाण्याचे दुर्भिक्ष्य सर्वत्र जाणवू लागले. पडलेल्या दुष्काळामुळे शेतीचे, मुक्या जनावरांचे व नागरिकांचे अतोनात हाल पाहवत नव्हते. अशावेळी तत्कालीन मठाधिपती आत्मागिरी महाराज, विश्वस्त व ग्रामस्थ यांनी सुमारे २५ हजार रुपये खर्चून पंचक्रोशीतील कटगुण, धावडदरे, शिंदेवाडी, काटकरवाडी, रामोशीवाडीलगतच्या वाड्यावस्त्या यासह पुसेगावातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला. यावर समाधानी न होता देवस्थानने पुढाकार घेऊन लोकसहभागातून महात्मा जोतिराव फुले जल व भूमी संधारणाची सुमारे ३६ लाखांची कामे केल्याने २००३-०४ या वर्षाकरिताचा पुणे विभागीय स्तरावर व सातारा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक देऊन या देवस्थानला गौरविण्यात आले.

कोरोना जागतिक महामारीच्या काळात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने गावातील नागरिकांना भरपूर मदत करण्यात आली. आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप, महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवस्थान ट्रस्टने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तीन लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. सातारा जिल्ह्यातील कोविड सेंटरसाठी १५० पीपीटी किट पुरविल्या तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला पूर्णपणे सुर्वणमंडीत करून सोन्याचे आवरण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रा.केशव जाधव, पुसेगाव

Web Title: P.P. Pusewadi's journey to Pusegaon is possible only with the grace of Shri Sevagiri Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.