सातारा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.येथील राधिका रस्त्यावर प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र आहे. सुमारे २० एकर क्षेत्र या ठिकाणी आहे. या केंद्रात विविध पिके घेण्यात येतात. तसेच रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प चालविण्यात येतो. यावर्षी येथे उसाचे सुमारे अडीच एकर क्षेत्र आहे. तर सोयाबीन काढण्यात आले आहे.
रोपवाटिकेत नारळाची रोपे आहेत. येथील नारळाची रोपे आणि गांडूळ बीज शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्यात येत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी हे केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शिक्षण विभागाकडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बंद झाले होते.