सातारा : मान्सूनचा पाऊस लवकरच सुरू होत असून कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ५६५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्धही झाले आहे. तर खताचेही १ लाख ९ हजार टन आवंटन मंजूर आहे. त्यातील ११ हजार ४०८ मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरीपसाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने नियोजन झालेले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रामुख्याने खते आणि बियाणे आवश्यक असतात. पाऊस वेळेत सुरू झाला तर पेरणीही उरकते. पण, गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरीपावर दुष्काळाचे सावट असलेतरी कृषी विभागासह शेतकरीही तयारी आहेत. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे. यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणं अपेक्षित आहे. तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत १० हजार ५६५ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे. त्यामुळे लवकर पेरणी सुरू केलीतरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर पिकांसाठी खतांची आवश्यकता राहते. यासाठी शासनाने खरीप हंगामाकरीता १ लाख ९ हजार ५०१ मेट्रीक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. १ एप्रिलपासून २२ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे. तर ११ हजार ४८० मेट्रीक टन खताची विक्री झाली. तरीही जिल्ह्यात दुष्काळ असल्याने खताची विक्री कमी होती. त्यामुळे सध्या ७० हजार मेट्रीक टन खतसाठा शिल्लक आहे. परिणामी खताची टंचाईही भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचणी येणार नाही, अशी स्थिती आहे.
१२ भरारी पथके करणार कारवाई...दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.
मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येते. या हंगामासाठी पुरेशी खते आणि बियाणे उपलब्ध आहे. पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाकडून पूर्णपणे नियोजन करण्यात आलेले आहे.
- विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी