वेळे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:33+5:302021-02-19T04:30:33+5:30
वेळे : वेळे परिसरात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामानाचा अंदाज अचूक ठरला. या अवकाळी आलेल्या पावसाने लोकांची ...
वेळे : वेळे परिसरात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामानाचा अंदाज अचूक
ठरला. या अवकाळी आलेल्या पावसाने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच रबी
हंगामातील हाताशी आलेले ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान
झाले.
उन्हाळ्याची चाहूल लागली आणि अवकाळी पावसाने सुरुवात केली. दिवसभर कडक ऊन आणि रात्री सौम्य थंडी चालू असतानाच विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा
पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन तीव्र उष्णता नाहीशी झाली;
परंतु काढणीला आलेल्या पिकांना या पावसामुळे नुकसान पोहोचले. वेळे परिसरात
ज्वारी, गहू, हरभरा पिके मोठ्या प्रमाणात आहेत. या पावसाने व वाऱ्याने
काढणीला आलेली सर्व पिके अक्षरशः झोपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे
अतोनात नुकसान झाले आहे.
वेळे
परिसरात सुरूर, कवठे, जोशिविहीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.
सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर केंजळ शेंदुरजणे या भागात गारांचा पाऊस झाला.
आधीच शेतकऱ्यांची पिके शेतातच आडवी झाल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात
भरीस भर म्हणून अवकाळी पावसानेही या पिकांना हानी पोहोचवली, त्यामुळे
शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने
हिरावून घेतला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
वेळे
परिसरात वन्य प्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. तसेच
मध्यंतरी जोराच्या वादळामुळे देखील काही ठिकाणी पिके शेतातच आडवी झाली.
याचा रीतसर पंचनामा झाला; परंतु जी काही पिके यातून वाचली त्यांना मात्र या पावसाने नुकसान पोहोचवले. आधीच अडचणीत असलेला शेतकरी त्यामुळे हताश झाला. या अवकाळी पावसाने सर्व सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांचेही मोठ्या
प्रमाणात नुकसान केले.