सातारा : गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना केल्या.सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी गणेशमूर्ती कारागिरांची बैठक नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, विरोधी पक्ष नेता अशोक मोने, नगरसेवक राजू भोसले, सुजाता राजेमहाडिक, सुजाता गिरीगोसावी, नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रवी पवार म्हणाले, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नाही. त्यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेश मूर्तीची उंची अधिक असल्याने विसर्जनासाठी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कारागिरांनी यंदा शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे.नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, सण, उत्सव साजरे करताना पर्यावरण व प्रदूषणाचा विचारही करायला हवा. विसर्जन तळ्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यावेळी तळ्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, परपप्रांतीय कारागिरांमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या मूर्ती घडविल्या जातात. अशा कारागिरांवर पालिकेने प्रथम बंदी घालावी, अशी मागणी यावेळी उपस्थित कारागिरांनी केली.तळ्यासाठी पालिका न्यायालयात जाणारसातारा शहरात मूर्ती विसर्जनासाठी काही पारंपरिक तळी उपलब्ध असताना कृत्रिम तळ्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पारंपरिक तळ्यात मूर्ती विसर्जन झाल्यास हा खर्च वाचू शकतो. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी पारंपरिक तळ्यांना परवानगी देण्यात यावी, यासाठी पालिकेकडून पुन्हा एकदा न्यायालयात पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी दिली.