बचत गटाच्या नावाखाली खासगी सावकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:58+5:302021-03-19T04:37:58+5:30
मलकापूर : शहरातील काही बचत गटांच्या नावाखाली महिलांकडून खासगी सावकारी केली जात आहे. गरजू महिलांकडून पंधरा ते वीस टक्क्याने ...
मलकापूर : शहरातील काही बचत गटांच्या नावाखाली महिलांकडून खासगी सावकारी केली जात आहे. गरजू महिलांकडून पंधरा ते वीस टक्क्याने व्याज वसूल केले जात असून, प्रसंगी दमदाटीही केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी खासगी सावकारांविरोधात कारवाई सुरू केल्यामुळे मलकापुरातील पीडित महिलाही पोलिसांना निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनीही या प्रकाराची दखल घेत बचत गटाच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
महिला सक्षमीकरणासाठी बचतगट स्थापन करण्यात आले. काही बचत गटांनी प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न केले. मात्र, मलकापूर शहराची व्याप्ती वाढली असून, शहरात गेल्या दहा वर्षात बचत गटांची संख्याही वाढली आहे. बचतगट सक्षम करण्यासाठी पालिकेकडूनही सहाय्य मिळते. समाजातील काही गरीब, कष्टकरी महिलांच्या आयुष्यात काही बचत गटांनी सक्षमता आणली, हे खरे आहे. मात्र, काही बचत गटांच्या नावाखाली खासगी सावकारी सुरू आहे. अडाणी, गरजू महिलांना बचत गटाचे पैसे द्यायचे आणि त्याबदल्यात पंधरा, वीस, पंचवीस टक्के व्याज उकळायचे, असा उद्योग सुरू आहे.
आगाशिव नगर भागातील काही बचत गटांनीही खासगी सावकारी सुरू केली असून, काही शिक्षक कुटुंबातील महिलाही यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. ज्या महिलांनी अडचणीला पैसे घेतले त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घालणे, साहित्य उचलून नेणे, गुंड पाठविण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या बचत गटांच्या आडून काही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याने खासगी सावकारीत महिलांनीही जोर धरला आहे.
- चौकट
तक्रार द्या, कारवाई करू!
पोलिसांनी खासगी सावकारीप्रकरणी कऱ्हाडातील एकाला नुकतीच अटक केली. या पार्श्वभूमीवर मलकापूर, आगाशिव नगर भागात खासगी सावकारीचे आणि दमदाटीचे उद्योग कोणी करत असेल तर तक्रार द्या, कडक कारवाई करू, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी केले आहे.