कराड
दी कराड जनता सहकारी बँक लि. कराड ही बँक दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी अवसायनात निघाली होती. डीआयसीजीसीने विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफाॅर्म सादर केलेल्या ठेवीदारांना त्यांच्या 5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना विमा क्लेम रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्यात 39032 ठेवीदारांना 329 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सदर रक्कम त्यांच्या अन्य बँकेतील खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया बुधवारी ( दि.05 मे) पासून सुरू होत असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करू नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मूळ कागदपत्रांसह संबंधित शाखेत संपर्क करावा.
ठेवीदारांची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली असली तरी मंजूर रक्कम त्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेला डीआयसीजीसीने किमान तीन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. कोविड परिस्थितीमुळे हा कालावधी वाढूही शकतो. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारे घाई-गडबड करण्याची गरज नाही. शाखेत बोलवणे आल्यानंतर मूळ आधार कार्ड व पॅन कार्ड सोबत घेऊन आपल्या मूळ ठेव पावत्या आणि पासबुक जमा करून त्याची पोहोच घ्यावी. कराड जनता बँकेत त्याची पडताळणी करून पुढील सात दिवसांत संबंधित ठेवीदारांना त्यांनी कळविलेल्या अन्य बँकेतील खात्यात रकमा जमा देणेबाबत डीआयसीजीच्या सूचनेनुसार बँक ऑफ बडोदाला यादी पाठविण्यात येईल.
बँक ऑफ बडोदाच्या मुंबईमधील ताडदेव शाखेमार्फत कराड जनता बँकेने सादर केलेल्या यादीनुसार संबंधित ठेवीदारांच्या खात्यावर क्लेम मंजूर रकमा वर्ग होतील. त्या बँकेत कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, स्टाफची समस्या यामुळे ठेवीदाराने त्यांच्या मूळ पावत्या जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
क्लेमफाॅर्म जमा केलेल्या काही ठेवीदारांचे प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे मंजूर झालेले नाहीत, त्यांना बँकेमार्फत संपर्क करून आवश्यक त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तर ज्या ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्लेमफाॅर्म जमा केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या शाखेत आवश्यक कागदपत्रांसह ते जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. क्लेमफाॅर्म डीआयसीजीकडे पाठवून मंजूर झाल्याशिवाय कोणालाही ठेव रक्कम मिळणार नाही, असेही मनोहर माळी यांनी आवर्जून सांगितले आहे.