Lok Sabha Election 2019 सातारा अन् माढ्यात प्रचार तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:57 PM2019-04-21T23:57:14+5:302019-04-21T23:57:30+5:30
सातारा : एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या चर्चेचा विषय राहिलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ...
सातारा : एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या चर्चेचा विषय राहिलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आता सार्वजनिक प्रचार थांबला असला तरी गृहभेटी, छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर वाढणार आहे. तर उमेदवारांची खरी परीक्षा ही मंगळवारी असणार आहे. २३ एप्रिलला मतदान होणार असून, मतदारराजा कौल कोणाला देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्हा हा दोन लोकसभा मतदार संघामध्ये विभागला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा, वाई, कोरेगाव या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. तर माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश होेतो. सर्वात जास्त नाट्यमय घडामोडी या दोन्ही लोकसभा मतदार संघात घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा आणि माढ्याकडे लागले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व मागील दहा वर्षांपासून उदयनराजे भोसले हे करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र, शरद पवार यांनी उदयनराजेंनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या अणि उदयनराजेंचा प्रचार सुरू केला. उदयनराजेंच्या विरुद्ध माथाडी नेते नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. माथाडी कामगार नेता म्हणून प्रतिमा असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, जागा वाटपामध्ये साताऱ्याची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.
माढा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना विरोध होत असल्याचे पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पुन्हा त्यांनी माघार घेतली. दरम्यान, राजकीय घडामोडीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्याचवेळी भाजपच्या पाठिंब्याने सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष असलेले संजय शिंदे यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात भाजपने काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मैदानात उतरवले.
मुख्यमंत्री अन् शरद पवारांच्या सभा
सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, नेत्यांच्या सभा झाल्या. सर्वात अधिक नेत्यांच्या सभा झाल्या त्या माढा मतदारसंघात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अकलुजला सभा घेतली. माढा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा तर शरद पवार यांनी चारवेळा सभा घेतली. तसेच मंत्री नितीन गडकरी, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याही सभा झाल्या.