रामापूर : देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किमती वेगाने वाढत आहेत. आज शंभर रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने राज्यातील सामान्यांना आज दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाट वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १० २६ २६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे.
डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली. जे खत ११८५ रुपयांना होते ते आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १० २६ २६ चे ५० किलोचे पोते ११७५ रुपयांचे होते, ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे काम सरकारने केले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, पाटणचे नगराध्यक्ष अजय कवडे, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेडगे, गुरुदेव शेडगे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटण विधानसभा मतदार संघातर्फे दरवाढीचा निषेध करत पाटणच्या तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत आहेत. परंतु भाजपचे मोदी सरकार याकडे मुद्दाम लक्ष देत नाही. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी बांधवांचे बळी गेले आहेत, ही कृषिप्रधान देशासाठी लाजिरवाणी बाब आहे तरी केंद्र शासनाने रासायनिक खतांची व इतर दरवाढ तातडीने मागे घ्यावी व शेतकरी बांधवांना आधार द्यावा.