सातारा : लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने साताऱ्यात हिंदू जनआक्रोश भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधींसह शेकडेजण सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली.साताऱ्यातील राजवाडा येथून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. ५०१ पाटी, पोलिस मुख्यालय, पोवई नाका या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. मोर्चेकरांच्या हातात विविध संदेश असणारे फलक होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर सभेत रूपांतर झाले. तर यावेळी प्रमुख लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू धर्माची आस्था दुखविणारे अनेक प्रसंग देशभरात घडत आहेत. लव्ह जिहाद, गोवंश हत्या, धर्मांतरणाचे प्रकार होऊ लागलेत. त्याचबरोबर देशातील महापुरुषांचाही वेळोवेळी अपमान होत असून, दिवसेंदिवस याचे प्रमाणत वाढतच चालले आहे. काही दिवसांपूर्वी आफताब पुनावाला या व्यक्तीने हिंदू भगिनीची हत्या करून मृतदेहाचे ३५ हून अधिक तुकडे केलेत. ही घटना अतिशय निंदनीय अशी आहे. अशा धर्मांध विकृतींवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
सभेत मान्यवरांचे मार्गदर्शन...जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकरांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी चुकीच्या प्रकाराविरोधात सर्वांनी एकत्र यावे. तसेच चुकीच्या घटनांसाठी बाहेरील देशातून पैसा येत आहे. देशाचे तुकडे होऊ नयेत, यासाठी एकसंध राहावे, असे आवाहन करण्यात आले.