फलटण : एमपीएससी परीक्षा स्थगित ठेवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ४ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे नमूद करीत या निर्णयाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सूचनेनुसार फलटण भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीर पाठिंबा देत आहोत, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दिनांक १४ मार्च याअगोदर निश्चित केलेल्या तारखेलाच एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरपरिषद गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली हैद्राबाद अशा मेट्रोपोलिटन सिटीमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची मुले एमपीएससीच्या अभ्यासासाठी येत असतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही स्वतःची काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुले अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास करतात. हलाखीची परिस्थिती असताना आपला मुलगा शासकीय अधिकारी व्हावा, यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या शिक्षणासाठी पैसा पाठवितात. परंतु महाविकास आघाडी सरकारने सहावेळा परीक्षा पुढे ढकलून त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.
राज्य शासन कोरोनाचे कारण सांगत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये राज्य शासनाची दुटप्पी भूमिका आहे. एका बाजूला आरोग्य विभागाची परीक्षा होऊ शकते. वेगवेगळे राजकीय कार्यक्रम होऊ शकतात. परंतु एमपीएससीच्या परीक्षा होऊ शकत नाहीत. तरी याबाबत राज्य शासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भटक्या विमुक्त जाती, जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा उषा राऊत, शहराध्यक्षा विजया कदम, नगरसेविका मदलसा कुंभार, मीना नेवसे, अभिजित नाईक - निंबाळकर, अमित रणवरे, नीलेश चिंचकर, राहुल शहा, प्रसाद शिंदे, संजय गायकवाड, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.