भाज्यांबरोबरच डाळीही महाग; मसूर, हरभरा डाळ भागवते भूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:42+5:302021-07-27T04:40:42+5:30
सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर ...
सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांबरोबरच डाळीही महाग झाल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, त्यांच्यावर मसूर व हरभरा डाळींवर भूक भागविण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ही ४० रुपये किलोच्या आत नाही. टोमॅटो आणि कोबीचाच दर आवाक्यात आहे. काही दिवसांपूर्वी तर वाटाण्याचा दर १०० रुपये किलोच्या पुढे गेला होता. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागले. त्यातच मागील काही महिन्यांपासून तूर, मूग, उडीद अशा डाळींचे दरही १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. भाज्या महाग म्हणून डाळींना पसंती द्यावी तर त्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे थोड्या स्वस्त असणाऱ्या हरभरा व मसूर डाळींना पसंती देण्याची वेळ आली आहे.
.............................
चौकट :
डाळींचे दर (प्रति किलो)
हरभरा ८०-८५
तूर ११०-१२०
मूग १००-११०
उडीद ११०-१२०
मसूर ९०-९५
........................................
म्हणून डाळ महागली...
- कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला ठराविक वेळेची मर्यादा आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे डाळींचे दर अजूनही तेजीत असल्याचे दिसत आहे.
- जिल्ह्यात अजूनही डाळींची मोठ्या प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे आहे तो साठा विकावा लागत आहे. त्याचबरोबर नवीन डाळी आल्यानंतर दर उतारण्याची शक्यता आहे. पण, सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
................................................
भाज्यांचे भाव (प्रति किलो)
बटाटा ३० ते ४०
कांदा २० ते ३०
टोमॅटो २० ते ३०
काकडी २० ते ३०
भेंडी ४० ते ६०
गवार ६० ते ८०
वाटाणा ८० ते १००
वांगी ४० ते ६०
कारले ४० ते ६०
ढबू ४० ते ६०
..............................................
म्हणून भाज्या कडाडल्या...
जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यातच अतिवृष्टीने अनेक भागात भाज्यांचे नुकसान झाले आहे. पाण्याबाहेर भाज्या काढणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढत चालले आहेत.
........................................................
सर्वसामान्यांचे हाल...
कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आता भाज्यांचे दर वाढले आहेत तसेच डाळीही महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना किचनचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे.
- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी
..........
सध्या कोणतीही भाजी घ्यायला गेले तरी ४० रुपयांच्याच पुढे आहे. तर डाळींनाही किलोसाठी १००, १२० रुपये द्यावे लागतात. यामुळे किचनासाठीचा खर्च वाढतच चालला आहे. एक वर्षापासून अशी स्थिती आहे.
- रमा पवार, गृहिणी
...................................................................