रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:00+5:302021-01-13T05:42:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून, आतापर्यंत दोन लाख एक हजार हेक्टर पेरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून, आतापर्यंत दोन लाख एक हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्राच्या जवळपास ९२ टक्के पेर पूर्णत्वाकडे गेली आहे. त्याचबरोबर यावर्षी गहू आणि हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १५ हजार हेक्टर होते. यंदा मात्र, क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार दोन लाख १९ हजार ११९ हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक एक लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पीकही काही प्रमाणात घेण्यात येते.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पेरणीला वेळेत सुरुवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. असे असलेतरी नंतर पेरणीने वेग घेतला. जिल्ह्यातील ज्वारीची पेरणी नोव्हेंबरपूर्वीच पूर्ण झाली. त्यानंतर गहू आणि हरभऱ्याची पेरणी करण्यात आली. राने उपलब्ध होतील तसतशी पेरणी वाढली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन लाख एक हजार १०३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.७८ आहे, तर जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे सर्वसाधारणपणे एक लाख ३९ हजार २०० हेक्टर आहे. एक लाख २७ हजार ३५७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.४९ आहे, तर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे.
जिल्ह्यात गव्हाची आतापर्यंत ३३ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ९५.७३ टक्क्यांवर ही पेरणी आहे तर मक्क्याची ११ हजार ७१७ आणि हरभऱ्याची २७ हजार ४७७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मक्क्याची ९६ आणि हरभऱ्याची पेरणी ९० टक्क्यांवर झालेली आहे.
चौकट :
माणमधील पेरणी पूर्ण...
जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होता, तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी झाला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. तसेच रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रही कमी होते. यंदा मात्र, वाढ झालेली आहे. माणमध्ये आतापर्यंत १०१ टक्के, खटाव ८९.६५ आणि फलटण तालुक्यात ८७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.
...