राहुल गांधींचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच खासदारकी रद्द - पृथ्वीराज साठे
By दीपक देशमुख | Published: March 31, 2023 05:02 PM2023-03-31T17:02:00+5:302023-03-31T17:03:28+5:30
'परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीच्या मार्केटिंगसाठी'
सातारा : अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा, हा राहुल गांधींनी संसदेत केलेला प्रश्न जिव्हारी लागल्यामुळेच स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसामचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधान परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीचे मार्केटिंग करायला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सातारा येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रणजितसिंह देशमुख, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, रजनी पवार, अजित पाटील-चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, अरबाज शेख-मोकाशी आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने मोदी आणि अदानी यांच्या भागीदारीबाबत वास्तव जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने देशभरात पत्रकार परिषदा आयोजित केल्याचे सांगून साठे म्हणाले, देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ठेका अदानी यांच्या माेठ्या भावाच्या कंपनीकडे आहे. याच कंपनीत एका चँग चूंग लिंग या चिनी उद्योजकाचीही मोठी गुंतवणूक आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही गंभीर बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे, ऑस्ट्रेलियाचे दौरे केले. त्यामुळे अदानीला ठेके मिळाल्याचा आरोप साठे यांनी केला.
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटक निवडणुकीत सुशील मोदी व नीरव मोदींचे नाव घेऊन जे वक्तव्य केले, त्याप्रकरणी सुरत उच्च न्यायालयात खटला दाखल केला; पण फिर्यादीने यावर स्थगिती आणली होती. यानंतर राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये संसदेत उपस्थित केलेले प्रश्न जिव्हारी लागले. यामुळेच २०१९ चे प्रकरण पुन्हा बोर्डावर आणले. अदानीला मोदी एवढे का पाठीशी घालत आहेत. अदानी म्हणजे देश आहे काय? सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून, २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आता अनेक राजकीय नेत्यांना वाटू लागली असल्याचेही साठे यावेळी म्हणाले.
अदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी दबाव
अदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एसबीआय कंपनीवर दबाव आणला. देशातील सर्वसामान्यांचा पैसा एलआयसीमध्ये गुंतला आहे. या कंपनीला अडचणीत आणण्याचे काम अदानी समूहात गुंतवायला भाग पाडले. यामुळे एलआयसी अडचणीत आली आहे. हिंडेनबर्गच्या पहिल्या अहवालाने इतकी दाणादाण उडाली. आता दुसरा अहवाल आल्यानंतर काय हाेईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.