पड रं पावसा, पड रं पाण्या, कर पाणी पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:22+5:302021-07-07T04:48:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातका वाणी’ शेतकऱ्यांच्या व्यथा अगदी थोडक्या शब्दात मांडणाऱ्या या गीताची आठवण येणारी परिस्थिती सध्या खंडाळा तालुक्यात ओढवली आहे. खरीप हंगामाची जोरदार सुरुवात झाल्यानंतर सुमारे साठ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र आता पावसाने चांगलीच दडी मारल्याने उगवलेली पिके जागीच कोमेजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस लवकर पडला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात यावर्षी मान्सून लवकर सक्रिय झाला. सुरुवातीलाच पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून खरिपाच्या पिकांची पेरणीला सुरुवात केली. खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मका, घेवडा, सोयाबीन, वाटाणा, मूग, कडधान्ये व इतर गळिताची धान्ये या पिकांच्या एकूण ९़२६३ हेक्टर क्षेत्रापैकी ५,५४५ हेक्टर क्षेत्राची पेरणी पूर्ण झाली आहे. बहुतांशी पिके उगवून आली आहेत. त्यामुळे उर्वरित पेरणी होऊन यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळण्याची गरज असतानाच पावसाने ओढ दिल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
खरीप हंगाम चांगला होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यासाठी हजारो रुपये भांडवल घातले आहे. परंतु पिके उगवून आल्यानंतर पावसाअभावी ती कोमेजून वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पिकांचे नुकसान होण्याबरोबरच आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे.
चौकट
दुबार पेरणीचे संकट...
खंडाळा तालुक्यात खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के पेरणी पूर्ण झाली असताना ही पिके पावसाअभावी संपुष्टात आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी देवाकडे धावा करीत बळीराजाचे डोळे चातकाप्रमाणे आभाळाकडे लागले आहेत.
कोट..
मान्सूनच्या पावसाची सुरुवात चांगली झाल्याने खरिपाची पेरणी पूर्ण केली. लॉकडाऊन असल्याने आर्थिक स्थिती बिकट असताना कर्ज घेऊन बी-बियाणे घेतले. पिकेही चांगली उगवली; पण पावसाने धक्का दिल्याने ती पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. येत्या सप्ताहात पाऊस पडला नाही तर हंगाम वाया जाणार आहे.
-राजेंद्र चव्हाण, शेतकरी
खंडाळा तालुका खरीप हंगाम पिकांची स्थिती ...
भात - सर्वसाधारण क्षेत्र - ८७९ हे. , पेरणी क्षेत्र - ० हे टक्केवारी - ० %, बाजरी - सर्वसाधारण क्षेत्र - ६३०५ हे. , पेरणी क्षेत्र - ४३६० हे., टक्केवारी - ६९ %, मका - सर्वसाधारण क्षेत्र - ६१ हे., पेरणी क्षेत्र - २७ हे., टक्केवारी - ४४ टक्के, घेवडा - सर्वसाधारण क्षेत्र - ६० हे. , पेरणी क्षेत्र - ६० हे. टक्केवारी - १०० %, वाटाणा - सर्वसाधारण क्षेत्र - ५४ हे. , पेरणी क्षेत्र - ५४ हे. टक्केवारी - १०० % , मूग - सर्वसाधारण क्षेत्र - ३०१ हे. , पेरणी क्षेत्र - ४९ हे. टक्केवारी - १६ % , उडीद - सर्वसाधारण क्षेत्र - ३७८ हे. , पेरणी क्षेत्र - ० हे. टक्केवारी - ० % , इतर कडधान्ये- सर्वसाधारण क्षेत्र - ५३३ हे., पेरणी क्षेत्र - ४२ हे., टक्केवारी - ८ %, भुईमूग - सर्वसाधारण क्षेत्र - ३९५ हे., पेरणी क्षेत्र - १६० हे., टक्केवारी - ४०% , सोयाबीन - सर्वसाधारण क्षेत्र - ३४५ हे., पेरणी क्षेत्र - ४३१ हे. टक्केवारी - १२४ % , गळीत धान्य - सर्वसाधारण क्षेत्र - १९ हे. , पेरणी क्षेत्र - १० हे. टक्केवारी - ५२ % , एकूण - सर्वसाधारण क्षेत्र - ९२६३ हे . , पेरणी क्षेत्र - ५५४५ हे , टक्केवारी - ५९ %
.............................................
०५खंडाळा पीक
फोटो मेल केला आहे