पावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:16 PM2019-06-13T12:16:12+5:302019-06-13T12:19:40+5:30

सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरापूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तरीदेखील बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कक्ष डुलक्या खात आहेत. या कक्षांना बुस्टर डोस दिला नाही तर लोकांवर मोठी आपत्ती येऊ शकते.

In the rainy season; Need for booster dosage for disaster cells! | पावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!

पावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!

Next
ठळक मुद्देपावसाळा तोंडावर; आपत्ती कक्षांना बुस्टर डोसची गरज!विभागांतील दूरध्वनी अद्यापही नॉट इन सर्व्हिस

सातारा : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरापूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. तरीदेखील बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कक्ष डुलक्या खात आहेत. या कक्षांना बुस्टर डोस दिला नाही तर लोकांवर मोठी आपत्ती येऊ शकते.

पाटबंधारे विभागातील वायरलेस विभागातील दूरध्वनी अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहे. धरणक्षेत्रात पावसाचा हाहाकार सुरू झाल्यास धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. त्याआधी धरण व नदीकाठच्या स्थानिक जनतेला सूचना कराव्या लागतात. काही प्रश्न असल्यास लोकांनी या विभागात दूरध्वनी करायचा झाल्यास येथील दोन्ही फोन बंद आहेत.

दूरध्वनी दुरुस्त करण्यासंदर्भात हालचाली होताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातील दूरध्वनीही उचलला जात नाही. साहजिकच आपत्ती कोसळल्यानंतर दाद कुणाकडे मागायची? हा प्रश्न लोकांना सतावू लागला आहे.

सातारा तालुक्यातील धावडशी या गावात गेल्या चार दिवसांपासून वीज गायब आहे. वीज दुरुस्ती झाली नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची ओरड झाली आहे. वादळी वाऱ्याने खांब पडल्याने ही दुरुस्ती सुरू असल्याचे वीज विभागाने स्पष्ट केले असले तरी चार-चार दिवस एखाद्या गावात वीजच नसणे, ही किती त्रासदायक बाब आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे व वीज आली नाही तर वीज कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ९ मे रोजी पाटबंधारे, पोलीस, नगरपालिका, एसटी महामंडळ, वीज विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आपापल्या कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या; परंतु अद्यापही असे विभाग सुरू झाले नसल्याचे चित्र आहे.

पाटबंधारे विभागाने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत कळवावे. अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. नगरपालिकांमध्ये २४ तास कार्यरत असणारा कक्ष सुरू करण्याबाबतही सूचना केल्या आहेत. सर्व विभागांनी कागदी घोडे नाचवत सूचना करण्याचे सोपस्कार पूर्ण केले असले तरी सतर्कता कुठेही पाहायला मिळत नाही.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कऱ्हाड, वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांना दोन रबर बोट, लाईफ जॅकेट, फायबरच्या रिंग, सर्च लाईट, मेगाफोन, फ्लोटिंग पंप वितरित करण्यात आले आहे. पावसाळ्यात आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी, तलाठी, महिला, ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

झाडाखालील आश्रय ठरू शकतो जीवघेणा

मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जागोजागी विजा चमकताना दिसत आहेत. पाऊस सुरू असताना झाडाच्या आश्रयाला थांबणे धोकादायक ठरणार आहे. पावसाळ्यात मोबाईलचा वापर टाळावा, अशा सूचना केल्या आहेत.

Web Title: In the rainy season; Need for booster dosage for disaster cells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.