सातारा : ‘साताऱ्यातील दोन्ही राजेंचे पुन्हा मनोमिलन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मनोमिलनासाठी दोघांनीही पुन्हा बसावे,’ अशी आमची मागणी आहे, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समितीचे सभापती सुनील काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचे नाव पत्रिकेत नसल्याचे विचारल्यानंतर ‘त्यांची नावे का नाहीत?, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे,’ असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २४ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात आयोजित केलेल्या सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने गुरुवारी दुपारी विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अॅड. डी. जी. बनकर, बाळासाहेब गोसावी, ईर्शाद बागवान, प्रताप शिंदे, संग्राम बर्गे, रंजना रावत, गीतांजली कदम यांच्यासह सातारा विकास आघाडीचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, ‘या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री रामदास आठवले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपस्थितींमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पशू-दुग्धविकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची नावेआहेत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. याबाबत पत्रकारांनी ‘दोन्ही राजेंचे मनोमिलन झाले असे म्हणायचे का?’ असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला, त्यावर सुनील काटकर म्हणाले, ‘आमची तर इच्छा मनोमिलन पुन्हा व्हावे, दोन्ही राजेंनी पुन्हा बसावे, अशीच आहे.’ त्यावर एकट्या काटकरांची इच्छा आहे की सातारा विकास आघाडीच्या सर्वांचाच त्याला दुजोरा आहे?, या प्रश्नावर बोलताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह उपस्थितांपैकी सर्वांनीच ‘आमची तशीच इच्छा आहे,’ असे एका सुरात सांगितले.
माजी खासदार व आमदारांची तसेच विविध पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचीही नावे पत्रिकेत आहेत. मात्र, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांची नावे पत्रिकेत का नाहीत?, या प्रश्नावर तर काटकरांनी ‘तुम्हाला माहितच आहे, खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने कार्यक्रम घेतला आहे, प्रोटोकॉलनुसार नावे सोहळ्यात घेतली जातील, परंतु या पत्रिकेत का घेतली गेली नाहीत, हेतुम्हीही चांगलेच जाणता,’ असे स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर थेट कासवर...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ फेब्रुवारी रोजी थेट कास पठारावर हेलिकॉप्टरमधून उतरणार आहेत. तिथून वाहनाने ते साताºयातील सोहळ्याकडे येतील. दुपारी विश्रांतीनंतर जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सोहळ्यासाठी ते जातील, असे यावेळी सांगण्यात आले.