पाचगणी : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे रामनवमी उत्सवावर त्याचे विरजण पडलं होतं. त्यावर मात करीत रामवाडी ग्रामस्थांनी तोंडाला मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत घरोघरी श्रीराम प्रतिमेचं पूजन करून श्रीराम नवमी उत्सव साजरा केला.रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वत्र सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.त्या आदेशान्वये रामवाडी ग्रामस्थांनी श्रीरामजन्म नवमी उत्सव रद्द केला. सर्व समाजाने एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत प्रत्येकाने आपापल्या घरोघरी प्रतिमा पूजन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत प्रत्येक गावकºयाने स्वत:च्या घरी गुरुवारी श्री रामचंद्र्रांच्या प्रतिमेचं पूजन करून गोडधोड जेवणाचा प्रसाद करीत अनोख्या पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा केला आहे.त्याचबरोबर कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सव कसा साजरा करावा, याचं अनोखं दर्शन घालून दिलं आहे. यातून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, हे सुद्धा या उत्सवाच्या निमित्ताने दाखवून दिले आहे.या अनोख्या उपक्रमामुळे रामजन्म उत्सव सोहळ्यात खंड न पडता अखंडपणे हा उत्सव साजरा केला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी सुद्धा राहत्या ठिकाणी प्रतिमा पूजन करून सर्वांनी सर्वत्र एकाच वेळेस १२:२० ला प्रतिमा पूजन करीत रामजन्म उत्सव अशाही पद्धतीने साजरा करू शकतो. याच उत्तम उदाहरण सर्वांच्या समोर ठेवलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, ग्रामस्थांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले होते. प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपण्याकरिता घरीच प्रतिमा पूजन करावे. त्यातून एक सण-उत्सव साजरा करण्यातून सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब होईल. त्यातून कोरोना संसर्गाला हरविण्याचे बळ मिळेल.- गणेश पाडळे,सरपंच रामवाडी.