सातारा जिल्ह्यात रमजान ईद, मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:23 PM2019-06-05T13:23:19+5:302019-06-05T13:24:21+5:30
मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवीत करण्यासाठी वरूणराजा लवकर बरस अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
सातारा : मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवीत करण्यासाठी वरूणराजा लवकर बरस अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध मशिदीच्या इमामांनी ईद उल फितरह्ण (रमजान ईद) बुधवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे ईदच्या पूर्वसंधेला बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
बुधवारी सकाळी पोवईनाका मस्जिद, बसस्थानक मस्जिद, पोलीस मुख्यालय मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज, कसाब मस्जिद (गुरुवार परज), मदिना मस्जिद (शनिवार पेठ), मक्का मस्जिद (बुधवार पेठ), बेगम मस्जिद (माची पेठ), मस्जिदे अक्सा (मंगळवार पेठ), सत्वशीलनगर, चांदतारा, कामाठीपुरा, औद्योगिक वसाहत या ठिकाणच्या मस्जिदींमध्ये सकाळी मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.
सदर बझार येथे सकाळी जामा मस्जीदपासून ईदगाह मैदानापर्यंत जुलूस काढण्यात आला. मुस्लीम बांधवांकडून अनेकांना शिरखुर्मा खाण्याचे निमंत्रणही देण्यात आले होते.