जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा शिरकाव... फलटणला सुरुवात
By नितीन काळेल | Published: August 22, 2023 07:05 PM2023-08-22T19:05:18+5:302023-08-22T19:05:32+5:30
पशूपालक धास्तावला; पशुसंवर्धनचा लसीकरणावर भर
सातारा : मागीलवर्षी पशुपालकांना हादरवरुन सोडणाऱ्या लम्पी चर्मरोगाचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला असून फलटण तालुक्यात तीन जनावरांना बाधा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पशुपालकांपुढे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. त्यातच काही जिल्ह्यात लम्पीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पशुसंवर्धनने लसीकरणास वेगाने सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला होता. कऱ्हाड तालुक्यात प्रथम निदर्शनास आलेल्या रोगाने नंतर जिल्ह्यात सर्वत्रच प्रसार केला. यावर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत लम्पी चर्मरोगाचे संकट होते. यामध्ये हजारो जनावरांना रोगाने गाठले तसेच जवळपास दीड हजार पशुधनाचा बळी गेला. यामुळे बळीराजा धास्तावला.
या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने मृत जनावरांमागे अऱ्थसहाय्य केले. मागील पाच महिने जिल्हा लम्पीमुक्त होता. असे असतानाच सध्या राज्यातील सोलापूरसह अन्य काही जिल्ह्यात जनवारांना लम्पी राेग होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. असे असतानाच फलटण तालुक्यात तीन जनावरांना लम्पी रोगाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिलेले आहे.