सातारा : सातारा बाजार समितीत नवीन कांद्याची आवक वाढतच असून, रविवारी गेल्या सहा महिन्यांतील विक्रमी आवक झाली. तब्बल ६२८ क्विंटल कांदा आला. आवक वाढल्याने दरात क्विंटलमागे ६०० रुपयांची घसरण झाली. क्विंटलला दीड हजारापासून २६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर टोमॅटो, फ्लाॅवर अन् कोबीला अजूनही दर कमीच आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात काहीशी वाढ होते. बाजार समितीत रविवारी फळभाज्याची एकूण १३८० क्विंटल आवक झाली. यामध्ये कांद्याची ६२८ क्विंटल आवक झाली. यावेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ३० ते ५०, कोबी ३० ते ४० रुपये आणि फ्लाॅवरला १० किलोला ३० ते ६० रुपये भाव मिळाल्याचे दिसून आले.
बोराची आवक सुरूच...
साताऱ्यातील बाजारपेठेत फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ नाही. बोराचीही आवक चांगली होत आहे. केळी, सफरचंदाचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
बटाटा स्वस्त...
सातारा बाजार समितीत अद्यापही काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडका १५० ते २००, कारल्याला १५० ते २०० रुपयांपर्यंत भाव १० किलोला आला. बटाटा आणि आल्याला क्विंटलला १८०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कांद्याचा दर पुन्हा वाढला आहे. ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कांदा भाजीमंडईत मिळत आहे. कांद्याचा दर टिकून असल्याचे दिसून येत आहे.
- कांताराम पाटील, ग्राहक
सातारा बाजार समितीत भाज्यांना अजून कमीच दर मिळत असल्याचे दिसत आहे; पण कांद्याचा दर टिकून आहे. तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे चांगले पैसे मिळतील.
- हरी यादव, शेतकरी
....................................................................