पाचवड/खंडाळा : ऊस उत्पादकांचे थकीत बिल देण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार महसूल खात्याने किसन वीर अन् खंडाळा साखर कारखान्यांच्या साखर साठ्याचे रजिस्टर रविवारी सील केले.ऊस नियंत्रण आदेशानुसार शेतकऱ्यांना गाळप उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम देण्यासाठी भुर्इंज येथील किसन वीर व खंडाळा कारखान्यांतील साखर जप्तीचे आदेश राज्य साखर आयुक्तांनी शनिवारी साताºयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले होते. त्यानुसार महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी दोन्ही कारखान्यांवर थडकले. त्यांनी या ठिकाणी असलेल्या साखर साठ्याचा तसेच मोलॅसिसचा पंचनामा करून स्टॉक रजिस्टरही सील केले.दोन्ही युनिटकडून सुमारे ९८ कोटी ७५ लाख रुपये शेतकºयांची देय रक्कम वसूल करण्यासाठी या कारखान्यांच्या साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिले होते. सातारा जिल्हाधिकारी यांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले होते.साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार भुर्इंज येथील कारखान्याची ऊस उत्पादकांची देय बाकी ७१ कोटी २८ लाख रुपये आहे. तर खंडाळा साखर कारखान्याची देय बाकी २७ कोटी ४६ लाख रुपये आहे. शेतकºयांची ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार कारखान्याच्या जंगम स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस देय बाकीची रक्कम ऊस पुरवठादारांना देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते.त्यानुसार शनिवार, दि. ७ रोजी रात्री उशिरा तहसीलदार विवेक जाधव यांनी खंडाळा साखर कारखान्याच्या साखर साठ्याची पाहणी करून त्याचा पंचनामा केला. तसेच स्टॉक रजिस्टरही सील केले. याबाबतचा अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.दोन्हीकडे साठा २४५ कोटींचा !किसन वीर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना २०१७-१८ सालातील द्यावयाची थकीत रक्कम सुमारे ७१ कोटी आहे. साखर साठ्याचा पंचनामा केला तेव्हा या ठिकाणी सुमारे ५ लाख ४९ हजार क्विंटल साखर तसेच १६५० मेट्रिक टन मोलॅसिस असल्याचे आढळून आले. बाजार भावाप्रमाणे याची किमत सुमारे किमान १६५ कोटींपेक्षाही अधिक असू शकते.खंडाळा साखर कारखान्याकडेही सुमारे २७ कोटींची थकबाकी असून, कारखानास्थळावर पंचनामा केलेला साठा २ लाख ८१ हजार क्विंटल आहे. बाजार भावानुसार किंमत किमान ८० कोटी होऊ शकते. दोन्हीकडील साखरेची किंमत सुमारे २४५ कोटी होते.
‘किसन वीर’, ‘खंडाळा’चे रजिस्टर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:19 PM