राजवाडा चौपाटीवरील ७२ विक्रेत्यांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:51+5:302021-01-09T04:32:51+5:30
सातारा : तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेली राजवाडा चौपाटी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. खासदार उदयजराजे भोसले यांच्या ...
सातारा : तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेली राजवाडा चौपाटी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. खासदार उदयजराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जलमंदिर येथे झालेल्या बैठकीत चौपाटीवरील ७२ विक्रेत्यांना जागांचे वाटप करण्यात आली. ही चौपाटी गांधी मैदान नव्हे तर आळूचा खड्डा येथील वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात सुरू होणार आहे.
कोरोनामुळे राजवाडा चौपाटी तब्बल आठ महिन्यांपासून बंंद आहे. त्यामुळे येथील शंभराहून अधिक विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने सर्व उद्योग, व्यवसाय, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्याने राजवाडा चौपाटीदेखील सुरू करण्यात यावी, अशी मागणी येथील विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी संबंधित विक्रेत्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर खा. उदयनराजे यांनी विक्रेत्यांचे आळूचा खड्डा येथील मोकळ्या जागेत तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी लकी ड्रॉ काढून ७२ विक्रेत्यांना जागांचे वाटप केले. एका गाड्यासाठी आठ बाय दहाची जागा सोडतीद्वारे देण्यात आली. या चौपाटीला सर्व सुविधा देण्याची खा. सूचना उदयनराजे यांनी केली. सर्व विक्रेत्यांनी या पुनर्वसनाबद्दल उदयनराजे यांचे आभार मानले.
यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, स्वीकृत नगरसेवक अॅड. दत्तात्रय बनकर, नगरसेवक मिलिंद काकडे, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, जितेंद्र खानविलकर, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम आदी उपस्थित होते.
(चौकट)
युनियन क्लबची जागा चर्चेत
राजवाड्याच्या मागील बाजूस युनियन क्लबची ४६ गुंठे जागा आहे. या जागेत सर्व सुविधांसह चौपाटी सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून त्याचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत या जागेची पाहणी करून निर्णय घेण्यात येणार आहे.
फोटो : ०८ जलमंदिर
खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी शुक्रवारी दुपारी राजवाडा चौपाटीवरील हातगाडीचालकांची बैठक पार पडली. (छाया : जावेद खान)