रवींद्र माने
ढेबेवाडी : ढेबेवाडी महसूल विभाग आणि आरोग्य विभागात ताळमेळ नसल्याने ढेबेवाडी येथील कोरोना स्मशानभूमीच कोरोनाचे प्रसार केंद्र बनले आहे. प्रशासन विविध उपाययोजना करून कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना येथील कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार होत असलेल्या स्मशानभूमीत नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. येथे तहसीलदारांच्या आदेशाचा प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावला असला तरीही नातेवाईक अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनासाठी कोणत्याही सुरक्षेशिवाय येत आहेत.
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ बेडचे कोरोना सेंटर उभारले आहे. येथे अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची अडचण असली तरी ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याने कोरोना रुग्णांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. मात्र अलीकडे या विभागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी कऱ्हाड, पाटणचा आधार घ्यावा लागत होता.
यावर पाटणचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत वांग नदीकाठी ढेबेवाडी नजीक असलेली पाचुपतेवाडी गावची स्मशानभूमी अधिगृहित केली. त्याच ठिकाणी कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र हे अंत्यसंस्कार करत असताना कोणतीही सुरक्षितता येथे दिसत नाही.
पहिल्या मृतावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची चिता पेटत असतानाच दुसऱ्याचा मृत्यू झाला तर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत प्रशासन कोणतीच सुरक्षितता बाळगत नाही. उलट ज्याची चिता पेटत आहे त्याच्याच नातेवाइकांना आरोग्य विभाग फोन करून ‘तुमची रक्षा घेऊन जा.. आम्हाला दुसऱ्या रुग्णावर अंत्यसंस्कार करायचे आहेत,’ असे सांगून कोरोना रुग्णवाढीला निमंत्रणच देत आहेत.
चिता नातेवाईकच रचताहेत
येथील स्मशानभूमी सॅनिटाईज केली जात नाही. याउलट मृतांचे नातेवाईकच चिता रचतात आणि अंत्यसंस्कारानंतर रक्षाही भरून नेतात. मग, ‘प्रतिबंधित क्षेत्रा’चा अर्थ काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाने याचे योग्य नियोजन करायला हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
...तर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
कोरोना स्मशानभूमीतून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी सुरक्षितता असायलाच हवी. तशा सूचना देऊन ‘कोरोना प्रतिबंधक क्षेत्र’ असा फलकही लावण्यात आला आहे. यासाठी आता नातेवाइकांनीही सहकार्य करायला हवे. मात्र कोरोना स्मशानभूमीत नातेवाइकांचा वावर होऊ नये यासाठी यापुढे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली.