अंतर्गत रस्त्यांची पालिकेकडून डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:47+5:302021-03-19T04:37:47+5:30
सातारा : सातारा पालिकेकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आला आहे. तात्पुरती मलमपट्टी का होईना परंतु रस्त्यातील खड्डे ...
सातारा : सातारा पालिकेकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आला आहे. तात्पुरती मलमपट्टी का होईना परंतु रस्त्यातील खड्डे डांबर टाकून बुजवले जात असल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सातारा शहर हे डोंगर उतारावर वसले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरुन वाहात येणाऱ्या पाण्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. गतवर्षीही समर्थ मंदिर ते शाहू चौक, राजपथ, कर्मवीर पथ, राधिका रोड, खंडोबाचा माळ, बुधवार नाका आदी ठिकाणच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पालिकेकडून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतले. ज्याठिकाणी सर्वाधिक खड्डे पडले आहेत, असे खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. समर्थ मंदिर चौक ते राजवाडा तसेच नगरपालिका मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्यानंतर फुटका तलाव परिसरातील खड्डेही बुजविण्यात आले.
बऱ्याच महिन्यांनंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले असले, तरी समस्या काही सुटलेली नाही. खड्डे दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा प्रशासनाने अंतर्गत रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.