प्रमोद सुकरेजिंती (ता. कराड) गावच्या वाघदरा डोंगर परिसरात वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यामध्ये दोन बिबटे आढळून आले असून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.जिंती येथे वाघदरा शिवारात गेली तिन ते चार दिवस झाले दिवसा बिबट्या ओरडण्याचा आवाज येत होता. वारंवार लोकांना प्रत्यक्ष दिसतही होता. या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी रोजी वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोन व्दारे या परिसराची पाहणी केली. बिबट्या ओरडण्याचा आवाज वारंवार येत असल्याने तो जखमी आहे किंवा अडकला असण्याची शक्यता होती.
मात्र ड्रोन पाहणीत नर व मादी जातीचे बिबटे असून प्रजनन काळ असल्याने ते एकत्र आले आहेत. आणखी काही दिवस ते एकत्र राहतील. या कालावधीत या परिसरात लोकांनी जाणे टाळावे. अशी माहिती कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी दिली. उपवसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनंरक्षक महेश झांजूर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल कोळे, बाबुराव कदम वनरक्षक सचिन खंडागळे, सुभाष गुरव, वनसेवक सतिश पाटील व पुणे येथील रेस्क्यु टिमचे कर्मचारी यांनी एकत्रित रेस्क्यू ची मोहीम राबवली. प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सुचना ग्रामस्थांना केल्या. त्यावेळी पोलीस पाटील संतोष पाटील, पै. सुशांत पाटील , सदस्य मेहुल आंबवडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.पहिल्यांदाच ड्रोनद्वारे रेस्क्यू ऑपरेशन जिंती येथे कोणत्या प्रकारच्या प्राण्याचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी सुरुवातीला साध्या ड्रोन च्या मार्फत शोध घेण्यात आला. मात्र गवत मोठे असल्याने त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले त्यांनी थर्मल सेंन्सर ड्रोन मधून शोध घेतला असता नर व मादी एकत्र फिरत असताना दिसून आले. अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन कराड तालुक्यात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
जिंती येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये नर व मादी बिबट्या आढळून आले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर हा प्रजनन काळ असतो. जिंती मधील बिसटे प्रजनन काळ असल्याने अजून चार ते पाच दिवस एकत्र राहू शकतात. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. त्या परिसरात जाणे टाळावे - तुषार नवले