कोयनानगर : रस्त्याची झालेली दुरवस्था, रेेंगाळलेले चौपदरीकरण, ठिकठिकाणी ठेकेदाराने अर्धवट सोडून दिलेले काम आणि निर्माण झालेला धोका यामुळे गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग नेहमी चर्चेत असतो. आता तामकडे, ता. पाटण गावाजवळ अस्तित्वात नसलेल्या गावाचे नाव फलकावर झळकवून ठेकेदाराने ‘जावईशोध’ लावला आहे. या चुकीच्या फलकाची विभागात चर्चा सुरू आहे.
वाहनधारक व प्रवाशांना रस्ता, गाव व गावाचे अंतर, वळणे आदीची माहिती व्हावी यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जातात. मात्र, गुहाघर-विजापूर महामार्गावर तामकडे गावाकडे जाणारा मार्ग व एमआयडीसीजवळ वेगवेगळे तीन फलक ठेकेदाराने लावले आहेत. या फलकांवर ठळकपणे विठ्ठलवाडी गावाचा उल्लेख आहे. दोन दिवसापूर्वी लावलेल्या या फलकाने खुद्द तामकडे गावातील ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले असून वाहनधारक व परिसरातील लोकांसाठी हा चर्चेचा विषय झाला आहे. ठेकेदाराने तीन फलकांवर ठळकपणे ‘विठ्ठलवाडी’ गावाचा उल्लेख केला आहे. तसेच त्या गावाकडे जाणारे दिशादर्शक चिन्हही दर्शविण्यात आले आहे. मात्र, हास्यास्पद प्रकार हा आहे की, ‘विठ्ठलवाडी’ नावाचे गावच त्या भागात नाही. मग ठेकेदाराने मनाने कारभार करून त्या गावाचा फलक कशासाठी लावला, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. ठेकेदार आणि महामार्ग विभागाला जर गावांची नावे माहिती नसतील तर त्यांनी त्याचा अभ्यास करावा. अथवा स्थानिकांकडून माहिती घेऊन फलकांवर गावाची नावे टाकावीत. अस्तित्वातच नसलेल्या गावाचा उल्लेख फलकावर कशासाठी केला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मुळातच कासवगतीने चालेल्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला ग्रामस्थ व प्रवासी अगोदरच वैतागले आहेत. त्यातच चुकीचा फलक लावून ठेकेदाराने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे काम केले आहे. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यानी या प्रकाराकडे लक्ष देऊन तातडीने चुकीचे फलक हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
- चौकट
सहा किलोमीटरवर डोंगरात वस्ती
तामकडे परिसरात ‘विठ्ठलवाडी’ नावाचं गाव नाही. मात्र, तामकडेपासून पाच ते सहा किलोमीटर पुढे पश्चिमेला कोयना बाजूस मारुल तर्फ पाटण ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत एक वस्ती आहे. डोंगरात असलेल्या या वस्तीला विठ्ठलवाडी म्हटले जाते. मात्र, तेथे स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. मारूल तर्फ पाटण गावाची ती वस्ती असून त्या वस्तीचा आणि या फलकाचा काडीमात्र संबंध नाही.
फोटो : १५केआरडी०५
कॅप्शन : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ तामकडे येथे फलक उभारण्यात आला असून विभागात कोठेही अस्तित्वात नसलेल्या ‘विठ्ठलवाडी’ गावाचा उल्लेख त्या फलकावर करण्यात आला आहे.