आनेवाडी टोलनाक्यावर पुन्हा राडा; वाहने जप्त
By admin | Published: July 3, 2015 11:37 PM2015-07-03T23:37:47+5:302015-07-04T00:01:28+5:30
धगधगता वाद : पोलिस बंदोबस्तावर प्रश्न चिन्ह
सायगाव : आनेवाडी टोलनाक्यावरील पेट्रोलिंगचा ठेका रद्द झाल्याच्या कारणावरून उफाळलेला वाद अजूनही धगधगत आहे. गुरुवारी रात्री टोलनाक्यावर सुमारे ४० जणांनी दहशत माजवत सशस्त्र हल्ला केला होता. दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही रात्री याच कारणावरून टोलनाक्यावर पुन्हा राडा झाला. या टोलनाक्यावरील पोलीस नेमके काय करीत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.गुरुवारी रात्री काही जणांनी ठेकेदारास गाडीतून बाहेर खेचत जमावाने काठ्या व पाईपांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आनेवाडी टोलनाक्यावर दहशतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर टोलनाक्यावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. असे असताना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास पुन्हा हा वाद उफाळून आला. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. वादावादी झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या सहा ते सात गाड्या पोलिसांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात नेल्या. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आनेवाडी टोलनाक्यावर सातत्याने असे प्रकार घडत असल्याने तेथे उपस्थित असलेले पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
तिघांना अटक
आनेवाडी टोलनाक्यावर गुरुवारी झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी तीनजणांना अटक केली. तेजस चंद्रकांत गाढवे (वय २८, रा. बोपर्डे ), प्रीतम चंद्रकांत कळसकर (२५, रा. मल्हार पेठ, सातारा), रणजित अमृत माने (वय ३१, रा. साखरवाडी, ता. फलटण) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.