रेल्वेच्या रुळावरून जातोय मृत्यूचा मार्ग !

By admin | Published: October 4, 2015 09:28 PM2015-10-04T21:28:45+5:302015-10-05T00:15:06+5:30

‘अल्याड-पल्याड’चा जीवघेणा खेळ रुळाच्या दुतर्फा शेकडो वस्त्या; भुयारी मार्गात गुडघाभर पाणी; ‘शॉर्टकट’ बेततोय जिवावर--आॅन दि स्पॉट

Road to the road of death! | रेल्वेच्या रुळावरून जातोय मृत्यूचा मार्ग !

रेल्वेच्या रुळावरून जातोय मृत्यूचा मार्ग !

Next

संजय पाटील-कऱ्हाड--रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेत; पण तरीही अनेकजण धावत्या रेल्वेसमोरून चक्क मृत्यूला हुलकावणी देत रूळ ओलांडण्याचं धाडस करतायत. रुळाच्या आसपास वस्त्या असणाऱ्यांसाठी ही कसरत रोजचीच. दिवसातून दहावेळा ते रुळावरून येरझाऱ्या घालतात; पण ‘अल्याड-पल्याड’चा हा खेळ नवख्यांसह स्थानिकांच्याही जिवावर बेततोय. कऱ्हाड तालुक्यातील कार्वे चौकी येथे शनिवारी सायंकाळी रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. या दुर्घटनेमुळे जिल्हा हादरला; पण रुळाच्या दोन्ही बाजूंस वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांना अशा घटना नवीन नाहीत. रेल्वेच्या धडकेत आजपर्यंत कुणी आपला जीव गमावलाय, तर कुणी आपला जिवाभावाचा माणूस; पण दुर्घटना घडूनही येथील जीवघेणी कसरत थांबत नाही. दिवसभरात अनेकवेळा या ग्रामस्थांना रूळ ओलांडावा लागतो. धोका दिसत असतानाही ग्रामस्थ हे धाडस करतात. ग्रामस्थच नव्हे, तर शाळकरी मुले व मोलमजुरी करणाऱ्या महिलांही अशाच पद्धतीने रूळ ओलांडतात. मुळात कार्वेसह वडगाव हवेली व शेणोलीतील अनेक ग्रामस्थांची शेतजमीन रुळाच्या पलीकडील बाजूस आहे. त्यामुळे त्यांना दररोज त्याठिकाणी जावे लागते. रूळ ओलांडण्यासाठी कार्वे येथील देसाई मळ्यानजीक व पुढे वडगाव हवेलीच्या हद्दीत भुयारी मार्ग आहेत. मात्र, या मार्गात गुडघाभर पाणी व दलदलीचे साम्राज्य असते. वाहने दूरच; पण या मार्गातून चालत जाणेही मुश्किल. तसेच जुने भुयारी मार्ग अरुंद व कमी उंचीचे असल्यामुळे त्या मार्गातून दुचाकी वगळता इतर कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. भुयारी मार्गही ठराविक ठिकाणीच आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी वस्त्या अथवा मळे आहेत त्याठिकाणचे ग्रामस्थ जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. कार्वेतील देसाई मळा, गोपाळनगर तसेच वडगाव हवेलीमध्येही रुळाच्या एका बाजूस ग्रामस्थांनी पाणंद रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो ग्रामस्थांची तसेच जनावरांची ये-जा असते. संबंधित ग्रामस्थांना रूळ ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचाच वापर करायचा असेल, तर त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी चालत जावे लागणार. परिणामी, अनेक ग्रामस्थ पायपीट टाळण्यासाठी ‘शॉर्टकट’ने रूळ ओलांडतात.
मृत्यूची भीती कुणाला वाटत नाही? रस्ता असता तर आम्ही जीव धोक्यात घातलाच नसता. कार्वे-देसाई मळा येथील संतोष देसाई ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते, ‘या शिवारात आमच्यासह अनेकांची शेती आहे. येथून गाव पाच किलोमीटर अंतरावर. दररोज एवढी पायपीट करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी या वस्तीतच राहणं पसंत केलंय; पण इथं रोज आम्ही मृत्यू जवळून पाहतो. भुयारी मार्गातून जावं तर तिथं गुडघाभर पाणी. त्यामुळे नाईलाजास्तव येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागतोय.’
संतोष देसाई यांच्यासह इतर ग्रामस्थांनीही भुयारी मार्गाचं हेच दुखणं मांडलं. भुयारी मार्ग चांगला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असंच येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रेल्वे रुळाशी समांतर असणाऱ्या पाणंद रस्त्यावर ग्रामस्थांनी स्वखर्चातून मुरूम टाकलाय; याबाबत उपाययोजना करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे.



पूल बांधलाय, आता तुमचं तुम्ही बघा !
एखादी दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेचे अधिकारी त्याठिकाणी येतात. तुम्ही असा रूळ ओलांडताच कशाला? असा प्रश्न ते ग्रामस्थांना विचारतात. त्यावेळी ग्रामस्थांनी भुयारी मार्गाची अवस्था संबंधित अधिकाऱ्यांना दाखविल्यास ‘आम्ही पूल बांधून द्यायचं काम केलंय. आता यापुढं तुमचं तुम्ही बघा,’ असा सल्ला त्या अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


पाहुणा पलीकडं, आम्ही अलीकडं !
कार्वे-देसाई मळ्यातील ग्रामस्थाकडे एखादा पाहुणा आलाच, तर त्याची दुचाकी रेल्वे रुळापर्यंत येते. तेथून पुढे जायचं तर दुचाकी रुळावरून पलीकडे घ्यावी लागते. त्यामुळे काही पाहुणे रुळाच्या अलीकडे उभे राहून आम्हाला फोन करतात. ‘रूळ ओलांडून या, आम्ही येत नाही,’ असे ते सांगतात. त्यामुळे पाहुण्यांना भेटण्यासाठी आम्हाला रुळाच्या पलीकडे जावे लागते, असे प्रकाश शिंदे यांनी सांगितले.


पालकांची वरात
देसाई मळ्यात रुळाच्या पलीकडील बाजूस अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील मुले कार्वे तसेच कऱ्हाडच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात. संबंधित शाळांची बस रुळापासून काही अंतरावर येऊन थांबते. मुलांना रूळ ओलांडून बसपर्यंत जावे लागते. मात्र, रूळ ओलांडण्याचा धोका लक्षात घेऊन येथील पालक दररोज आपल्या मुलाला रुळावरून पलीकडे सोडण्यासाठी व परत शाळा सुटल्यानंतर अलीकडे घेऊन येण्यासाठी जातात.



गुराखी रुळावर; जनावरे काठावर
रेल्वेची वेळ माहीत असल्याने जनावरे चारण्यासाठी घेऊन येणारे अनेक गुराखी रुळावरच बसतात. रेल्वे येण्याच्या थोडा वेळ अगोदर ते रूळ सोडून काही अंतरावर जाऊन थांबतात. हा प्रकार धोकादायक आहे. तसेच अनेकवेळा गुराख्याचे लक्ष नसताना जनावरे रुळावर येत असल्याचेही दिसते. अशावेळी रेल्वे आलीच तर गुराख्याला स्वत:चा जीव वाचवायचा की जनावरे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.


जनावरांचाही हकनाक बळी
रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंस शिवार व त्यातच जनावरांच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांवरील जनावरे तसेच मेंढ्या रुळाच्या परिसरात चरायला सोडली जातात. अनेकवेळा ही जनावरे रुळावर गेल्याच्या व रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या आवाजाने उधळलेले बैल गाडीसह रुळावर गेले होते. त्यामध्ये बैलाचा मृत्यू झाला होता.

Web Title: Road to the road of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.