सातारा : दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भरपावसात डोंगराळ रस्त्यांवरून धावपटू अहमहमिकेनं धावत असले, तरी अंतिम स्पर्धा सातारचे काही लॉजचालकच जिंकतात असा गौप्यस्फोट स्पर्धकांनी केलाय. काही ठिकाणी ऐनवेळी बुकिंग रद्द होतंय, तर काही ठिकाणी अडवून तिप्पट भाडं वसूल केलं जातंय, अशा स्पर्धकांच्या तक्रारी असून, ठराविक व्यक्तींमुळे सातारा शहर आणि या स्पर्धेबरोबरच इथला हॉटेल व्यवसायही बदनाम होण्याचा धोका आहे.सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉन या स्पर्धेला केवळ तीन वर्षांमध्येच प्रचंड प्रतिसाद मिळू लागला असून, राज्यभरातील स्पर्धकांबरोबरच राज्याबाहेरील आणि देशाबाहेरील स्पर्धकही साताऱ्यात येऊ लागले आहेत. अर्थातच त्यांना राहण्यासाठी शहरातील लॉज कमी पडतात. परंतु काही लॉजमालक याचा गैरफायदा घेऊन झालेले बुकिंग ऐनवेळी रद्द करणे, तीच खोली उशिरा आलेल्या स्पर्धकांना दुप्पट-तिप्पट भाड्याने देणे, दोन हजार रुपये भाडं देण्याची योग्यता असलेल्या खोलीसाठी सहा-सात हजार रुपये भाडं आकारणे असे मार्ग वापरत असल्याचा स्पर्धकांचा आरोप आहे.दहा आणि पाच किलोमीटरच्या या स्पर्धेत गेल्या वर्षी साताऱ्याबाहेरच्या दोन हजार धावपटूंचा सहभाग होता. सातारा हे तुलनेनं लहान शहर असल्यामुळं राहण्याच्या सुविधांवर मर्यादा आहेत. तरीही अनेक पर्याय वापरून संयोजक धावपटूंना मदत करतात. शहरातील सुविधांचा विचार करून नोंदणी सुरू केली असून, ती आवाक्याबाहेर जाऊ दिली जात नाही. नोंदणीसाठी विशेष ‘पोर्टल’ असून, स्पर्धकांनी आधीच राहण्याची सुविधा सुनिश्चित करावी, असा मजकूर त्यावर लिहिला आहे. यंदाही दोन हजार स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.काही स्पर्धक हॉटेल बुकिंगसाठी ‘पोर्टल’चा वापर करतात, तर काही जण थेट हॉटेलशी संपर्क साधतात. मात्र, एप्रिलमध्ये फोन करूनसुद्धा ‘जानेवारीतच हॉटेल फुल्ल झाले आहे,’ अशी उत्तरे ऐकायला मिळाल्याचं स्पर्धक सांगतात. नोंदणी करूनही काही वेळा स्पर्धकांना येता येत नाही. इतक्या आधी पैसे भरून हॉटेल बुक केले आणि काही कारणाने दौरा रद्द झाला तर काय करणार, या भीतीने साधारण तीन-चार महिने आधी हॉटेल बुकिंग करतात. तेही ऐनवेळी रद्द झाल्याचा अनुभव काही स्पर्धकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितला. पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या साताऱ्यातील हॉटेल व्यवसायासाठी या गोष्टी योग्य नसल्याचं मत त्यांनी नोंदवलंय. (प्रतिनिधी)बुकिंग सातारला, मुक्काम वाईलामुंबईचे धावपटू सुभाष पुट्टी यांना बुकिंग पोर्टल चालविणाऱ्यांकडूनच विचित्र अनुभव आला. त्यांनी ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं, तिथं त्यांच्या नावाची नोंदच नव्हती. त्यांनी शोध घेतला तेव्हा कळलं की याच नावाचं एक हॉटेल वाईमध्ये आहे. पोर्टलच्या कर्मचाऱ्यांनी ‘सातारा डिस्ट्रिक्ट’ एवढंच वाचून तिथं त्यांचं बुकिंग केलं होतं. साताऱ्यातील तिप्पट फुगलेले दर ऐकून त्यांना धक्का बसला. शेवटी ते वाईलाच राहिले आणि पहाटे उठून स्पर्धेसाठी साताऱ्याला आले. यंदा त्यांनी एका हॉटेलमध्ये बुकिंग केलंय; पण ते ऐनवेळी रद्द होणारच नाही, हे त्यांना खात्रीनंं सांगता येत नाही.किमान दर्जा निवडण्याची संधी द्याअव्वाच्या सव्वा पैसे घेता तर किमान हॉटेलचा दर्जा निवडण्याची संधी तरी द्या, अशी खेदजनक प्रतिक्रिया औरंगाबाद येथील एका महिला धावपटूने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. स्पर्धेचे दोन दिवस संपूर्ण हॉटेल बुक झालंय, असं त्यांना काही मोठ्या हॉटेलांमधून जानेवारीपासूनच सांगितलं जातंय. गेल्या वर्षी त्यांना हॉटेलच्या खोलीचं दिवसाचं भाडं साडेसात ते आठ हजार रुपये सांगितलं गेलं. भाड्याच्या तुलनेत दर्जा नव्हता. शेवटी संयोजकांनी बारा किलोमीटरवरील एका अॅग्रो फार्मवर त्यांची राहण्याची व्यवस्था केली. दोन-तीन महिने आधी बुकिंग करणं रास्त आहे; पण जानेवारीतच बुकिंग केलं आणि ऐनवेळी येणं जमलं नाही तर काय करणार, असा त्यांचा सवाल आहे.1यामुळेही वाढते समस्यास्पर्धेची नोंदणी सुरू झाल्यानंतर धावपटूंचे काही ग्रुप लगेच हॉटेलचं बुकिंग करून ठेवतात. त्यामुळंही समस्येत भर पडते आणि नोंदणी करतानाच काही जण राहण्याच्या सुविधेसाठी संयोजकांनाच विनंती करतात.2आॅगस्ट-सप्टेंबर हा कासच्या फुलांचा हंगाम असल्यामुळं मोठ्या संख्येनं पर्यटक साताऱ्यात येतात. अनेकजण कासबरोबर अन्य स्थळेही पाहतात आणि त्यासाठी त्यांना साताऱ्यात मुक्काम गरजेचा असतो.
धावतात स्पर्धक... जिंकतात लॉजमालक!
By admin | Published: July 03, 2015 9:57 PM