सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास दणका : सात हजार दंड, पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:15 PM2018-10-22T23:15:25+5:302018-10-22T23:16:41+5:30
बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड
कऱ्हाड : बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड करण्यात आला. तसेच अल्टर केलेला सायलेन्सर काढून दुचाकीचा मूळ सायलेन्सर बसविण्यास सांगण्यात आले.
कऱ्हाडात एमएच ५० एफ ४७४७ या क्रमांकाची दुचाकी असून, या दुचाकीचा सायलेन्सर मोठ्या आवाजाचा असल्याची तक्रार कऱ्हाडच्या वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार हवालदार मनोज शिंदे यांनी संबंधित दुचाकीवर वॉच ठेवला. दोन दिवसांपूर्वी ही दुचाकी हवालदार शिंदे यांना आढळून आली. त्यांनी संबंधित दुचाकी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणली.
दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर असल्याचे तसेच नंबरप्लेटवर आकड्याच्या माध्यमातून ‘दादा’ असे रेखाटल्याचे समोर आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी ही दुचाकी व त्याबाबतचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला. परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित दुचाकीची तपासणी केली. तसेच मालकाला अल्टर सायलेन्सर काढून त्याठिकाणी दुचाकीचा मूळ सायलेन्सर बसविण्यास सांगितले. त्यानुसार मालकाने हजार रुपये खर्चून दुचाकीला मूळ सायलेन्सर बसविला. तसेच आकड्याच्या माध्यमातून नावाने तयार केलेली फॅन्सी नंबरप्लेटही परिवहन अधिकाऱ्यांनी जप्त केली. नियमानुसार प्लेट बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या. दुचाकी मालकाने नियमानुसार नंबरप्लेट बसविल्यानंतर दुचाकीचा इन्शुरन्स काढण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार तीन हजार रुपयांचा इन्शुरन्सही काढण्यात आला.
या सर्व प्रक्रियेनंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दुचाकीच्या मालकास उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ६ हजार ८०० रुपये दंड केला. कºहाडसह परिसरात दुचाकीमध्ये अनावश्यक फेरबदल करणाºया तसेच मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार आहे.
कऱ्हाड शहरासह परिसरात अनेकांनी दुचाकींचे सायलेन्सर अल्टर केले आहेत. बुलेटला मोठ्या आवाजाचा फटाके वाजणारा सायलेन्सर काहींनी बसविला असून, अचानक होणाºया या मोठ्या आवाजामुळे पादचाºयांसह इतर प्रवासी घाबरतात. तसेच लहान मुले, वयोवृद्ध, रुग्णांना अशा सायलेन्सरच्या आवाजाने नाहक त्रास होतो.