वाठार स्टेशन : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेने ठेवी व कर्जवाटपात नेहमी तरलता ठेवली आहे. लाॅकडाऊन काळात महाराष्ट्रात अर्थकारण थांबल्याने अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना आपल्या संस्थेत सर्वच बाबतीत व्यवसायात वाढ झाली आहे, हे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्वासाचे प्रतीक आहे’, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये शांततेत व खेळीमेळीचे वातावरणात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन हणमंतराव पवार होते. व्यासपीठावर सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले. सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली.
अध्यक्ष हणमंतराव पवार म्हणाले, ‘अहवाल सालात वसुली कमी व एनपीएची तरतूद जादा करावी लागल्यामुळे लाभांश देता येत नाही. मात्र, पुढील वर्षी सभासदांना कमीत कमी पाच टक्के लाभांश देण्याचा प्रयत्न करू, असे अंदाजपत्रकीय नियोजन करण्यात आले आहे. ’
कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सभास्थळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर व तापमापक यंत्र याद्वारे कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. प्र. कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष बाबूराव काकडे यांनी आभार मानले. (वा. प्र.)
२०वाठार स्टेशन जाहिरात
: वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संचालक उपस्थित होते.