संगमनगर धक्का पूल पाण्याखालीच

By admin | Published: September 10, 2014 10:52 PM2014-09-10T22:52:15+5:302014-09-11T00:09:33+5:30

धोम, कण्हेरमधून विसर्ग : ३५ गावे अजूनही संपर्कहीन

Sangamnagar pushing pool under water | संगमनगर धक्का पूल पाण्याखालीच

संगमनगर धक्का पूल पाण्याखालीच

Next

सातारा : जिल्ह्याच्या धरण पाणलोट क्षेत्रांत संततधार सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर असून, धोम-बलकवडी, वीर, भाटघर, नीरा-देवघर ही धरणे पूर्ण भरली आहेत. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजता १०४.८२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. कण्हेर धरणातून दुपारी पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कण्हेर पाणलोट क्षेत्रांत जोरदार सरी कोसळत असल्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहेत. कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता १०.१० टीएमसी इतकी असून, धरणात ९.१८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी बारा वाजता धरणातून ४१५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. परिणामी जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन विभागाने वेण्णा नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार असल्यामुळे धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ इतकी असून, आजमितीस असणारा पाणीसाठा १०४.८२ टीएमसी इतका आहे. पाणीपातळी २१६३.२ फूट इतकी असून, धरणातून १४,१३४ तर पायथा वीजगृहातून २१११ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान, कोयनानगर येथे दिवसभरात २० (४६५५), नवजा ५ (५५२३) तर महाबळेश्वर येथे १६ (४४९६) मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि धोम-बलकवडी ही धरणे पूर्ण भरली आहेत. या धरणातून नदीपात्रात विसर्ग होत आहे. दरम्यान, उरमोडी धरणातून ३०० क्युसेक, वीर १५३११, धोम ३२८१, धोम-बलकवडी १९५३ तर महू धरणातून १३२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सर्वाधिक ७६ मिमी पावसाची नोंद महाबळेवर तालुक्यात झाली असून, जिल्ह्यात बुधवारी पहाटे आणि मंगळवारी दिवसभरात ११६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी अशी, कंसात एकूण पाऊस : सातारा ८.८ (९५८.४), जावळी १४ (१५०२.५), कोरेगाव १.१ (४११.६), कऱ्हाड २.३ (५६५.९), पाटण ९ (१३८१.५), फलटण १.१ (२६७.७), खटाव ०.५ (४३८.७), वाई २.५ (५६०.८) मिमी, खंडाळा ०.९ (४०६.७) आणि महाबळेश्वर ७६ (५४४५.२) मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी १०.६ मिमी पाऊस झाला असून, आजअखेर झालेल्या पावसाची नोंद १२२४१.६ मिमी इतकी आहे. तालुकानिहाय सरासरी १११२.९ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sangamnagar pushing pool under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.