संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण
By Admin | Published: October 10, 2014 10:07 PM2014-10-10T22:07:44+5:302014-10-10T23:02:15+5:30
सातारा : दि. १८ रोजी निकाल लागण्याची शक्यता
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, शनिवार दि. १८ रोजी या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी वर्तवली आहे.
बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी अॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. अॅड. पाटील म्हणाले, ‘या खटल्यातील संशयित उदय पाटील यांनी हे कृत्य करायला कारण काय आहे का, हे समोर आले नाही. सरकार पक्षाने या खून प्रकरणाची दोन कारणे सांगितली आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे, संजय पाटीलने विलासराव पाटील-उंडाळकर यांचा फोटो असलेले घड्याळ फोडून त्यावर पाय दिला. दुसरे कारण बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल उभे करू नये, यासाठी उदय पाटील यांनी संजय पाटीलवर दबाव आणला; मात्र खुनाच्या घटनेनंतर फिर्यादी धनंजय पाटीलचे एकूण तीन जबाब घेण्यात आले. त्यामध्ये कुठेही वरील कारण नमूद करण्यात आले नाही,’
अॅड. पाटील पुढे म्हणाले, ‘दि. २१ जानेवारी २००९ रोजी त्यावेळच्या पोलीस अधीक्षकांना फिर्यादीने निवेदन दिले होते. त्यामध्येही वरीलपैकी खुनाचे कोणतेही कारण दिले नाही. तसेच सरकार पक्षानेही ते शाबीत केले नाही. या खुनाचा जादा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तपासाच्या नावाखाली भूत उभे केले. जादा तपासासाठी अर्ज केला गेला. त्यामध्ये स्पष्ट कारणेही नाहीत. केवळ त्यांनी बोगस कहाणी पुढे आणली. खुनाच्या घटनेनंतर एकूण तीन अधिकाऱ्यांनी याचा तपास केला. त्यामध्ये उदयसिंह पाटील संशयित आरोपी आहेत. हे तिन्ही अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आले नाही. कारण उदय पाटील यांच्याविरोधात कसलेही पुरावे नाहीत, आणि नव्हते. तरीही तांबे यांनी या प्रकरणामध्ये उदय पाटील यांना गोवले. कटाची निश्चित तारीख सरकार पक्षाला सांगता आली नाही. विलासराव पाटील-उंडाळकर हे गेले ३५ वर्षे आमदार आहेत. त्यांची घराणेशाहीचे नेतृत्व उदयसिंह पाटील करतील, त्याचे आत्ताच पाय छाटले तर पुढे फार काही होणार नाही. त्यामुळेच या प्रकरणामध्ये उदयसिंहला नाहक अडकविले आहे. तसेच सध्या विलासराव पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत, याची न्यायालयाने नोंद घ्यावी.’ अॅड. धैर्यशील पाटील यांना अॅड. ताहेर मणेर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)